दादा भुसेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, दाढीला आग लागण्याचे…

103

‘दादा भुसे यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल,’ असे ट्वीट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले होते. यासंदर्भात मंगळवारी दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्टीकरण देत मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टीका संजय राऊतांवर केली होती. त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘दादा भुसेंच्या दाढीला आग लागण्याचे काहीही कारण नव्हते. मी त्यांच्यावर कोणताही आरोप केला नव्हता. मी फक्त खुलासा मागितला आहे. याप्रकरणातील शेतकरीही त्यांना खुलासा मागत आहेत. दादा भुसे यांनी १ कोटी ७५ लाख रुपये जमा केले. मात्र, त्यांच्या वेबसाईटवर केवळ दीड कोटी रुपये फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावाने दाखवले आहेत. १ फेब्रुवारीपासून त्या भागातील शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांना दादा भुसेंनी प्रश्न विचारावे.’

दादा भुसे विधानसभेत काय म्हणाले होते? 

राऊतांनी केलेली ट्वीट वाचून झाल्यानंतर दादा भुसे म्हणाले होते की, ‘या महागद्दाराने अशाप्रकारचे ट्वीट केले आहे. माझी सभागृहाला विनंती आहे की, जगाच्या पाठीवरील कोणत्याही यंत्रणेकडून या ट्विटची चौकशी करावी. या चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो तर राजकारणातून मी निवृत्त होईन. आम्हाला गद्दार बोलणारे हे महागद्दार आमच्या मतावर निवडून आले आहेत जर त्यांनी केलेले ट्विट खोटे आढळले तर त्यांनी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक संपादक पदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा कारण हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची आणि माननीय पवारांची करतात. जर राऊतांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक या गद्दाराला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.’

(हेही वाचा – संजय राऊत महागद्दार, हिंमत असेल तर राजीनामा द्यावा; मंत्री शंभूराज देसाईंचा विधानसभेत घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.