अमृता फडणवीस ब्लँकमेलिंग प्रकरण: अनिक्षाला २४, तर अनिल आणि निर्मला जयसिंघानियाला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

73

अमृता फडणवीस ब्लँकमेलिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनिक्षा जयसिंघानी, अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी यांना पोलिसांनी सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने अनिक्षा हिला २४ मार्च पर्यंत तर तिचे वडील अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी या दोघांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असताना मुख्य सरकारी वकील जयसिंह देसाई यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना पोलिसांच्या तपासांत प्रगती आहे, आरोपींविरोधात अधिकचे पुरावे सापडले आहेत, पोलीस कोठडीत अनिक्षाने तपासांत सहकार्य केले नाही, विचारलेल्या प्रश्नांची तिने उत्तरे दिली नाहीत, आरोपीचे सीडीआर तपासण्यात आले आहेत. डोंगलच्या माध्यमातून इंटरनेट आणि व्हॉट्सअॅप कॉलवर ती सतत मुख्य आरोपीच्या संपर्कात होती, त्याचा ठावठिकाणा तिला माहिती होता, याप्रकरणी तिच्या वडिलांसह आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या मोबाईलमधील डेटा मिळवण्याचे काम सुरू आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी अनिक्षा जयसिंघानीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली.

(हेही वाचा Nitesh Rane On Love Jihad: लव्ह जिहादवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, पीडितांनी न घाबरता तक्रारी करा)

यावेळी आरोपींच्या वकिलाने अनिक्षाला 19 तारखेच्या संध्याकाळी अटक होऊनही तिला उशिरा न्यायालयात हजर केल्याचे न्यायालयात सांगितले. त्यावेळी सरकारी वकिलांनी हा आरोप फेटाळला. गुजरातहून आरोपींना केवळ ताब्यात घेतले होते. त्याची रिसतर स्थानिक पोलिसांना माहिती देऊन प्रक्रिया पूर्ण केली होती. अनिक्षाला इथे आणले, ओळख पटवली आणि मगच कायदेशीर अटक करण्यात आली. अनिल जयसिघांनी आणि निर्मल जयसिंघानीला 20 मार्चच्या मध्यरात्री 2 वाजता ताब्यात घेतले त्यानंतर काल संध्याकाळी मुंबईत आणल्यावर 5 वाजता अटक दाखवली. या दोघांकरता सरकारी वकिलांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपी अनिल जयसिंघानीला तब्बल 25 वर्ष राज्य सरकारने सुरक्षा पुरवली आहे. साल 1984 पासून त्याने त्याच्याकडची गोपनीय माहिती तपासयंत्रणेला पुरवली. ज्याचा इतर प्रकरणांत पोलीसांना फायदाच झाला. अमृता फडणवीस यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. 10 कोटींची खंडणी मागितल्याचे मोबाईल संदेश आढळले. मात्र ज्या मोबाईलमधून हे मेसेज पाठवलेत तो अद्याप हस्तगत झालेला नाही. तो मिळवणे गरजेचे आहे, त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर त्यानंतर न्यायालयाने अनिक्षा हिला २४ मार्च पर्यंत तर तिचे वडील अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी या दोघांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.