आता पवारांच्या दुसऱ्या नातवाची चर्चा, रोहित पवारांच्या नावाने नवी संघटना

106

राज्याच्या राजकारणात कधी काय घडामोडी घडतील याचा काही नेम नाही. त्यातच राज्याचे राजकारण हे नेहमीच शरद पवार घराण्याच्या अवतीभवती फिरत असते. गेल्या महिन्याभरामध्ये तर शरद पवार यांच्यापेक्षा त्यांच्या नातवांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आधी पार्थ पवार आणि आता रोहित पवार चर्चेत आले आहेत. आधीच पार्थ पवार यांच्या वागण्याने पवार कुटुंबामध्ये आलेबेल नसताना आता रोहित पवार यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या संघटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा

राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची तरुणाईमध्ये क्रेझ असल्याने काही तरुण कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन केली. मात्र या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला असून, त्यांनी हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ अशा नावाने बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र, हा निर्णय रोहित पवार यांना पटलेला नाही.

रोहित पवार काय म्हणाले

रोहित पवार यांनी ट्विट करून त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचे समजले या सर्वांना माझी विनंती आहे की,मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील.”

पार्थ पवारांची ‘भाजपा’शी जवळीक

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे सध्या पक्ष विरोधी भूमिका घेत असल्याचे वारंवार पहायला मिळत असून, पार्थ पवार यांची भाजपाशी जवळीक वाढल्याची देखील चर्चा आहे. काही लोकांना मंदिर बांधून कोरोना जाईल असे वाटते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत  राम मंदिर भूमिपूजनाला अप्रत्यक्ष विरोधच दर्शवला होता. मात्र याच मुद्द्यावरून खुद्द शरद पवार यांच्याच घरात मतभेद असल्याचे पहायला मिळाले होते. पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा असे देखील पार्थ म्हणाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.