…तर उद्धव ठाकरे आणि पवारांनी राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडावे! रणजित सावरकरांची मागणी

119

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. भाजपा-शिवसेनेने राहुल यांना लक्ष्य केल्यानंतर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटानेही विरोधाचा सुरू आळवला आहे. त्यानंतर आता वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दांत निषेध करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे व शरद पवारांनी राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडलं पाहिजे तेव्हाच ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेला अर्थ प्राप्त होईल, असेही रणजित सावरकरांनी सांगितले.

( हेही वाचा : “आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय… त्यांची वीर सावरकर नव्हे अदानी गौरव यात्रा”, राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र )

काय म्हणाले रणजित सावरकर ?

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर म्हणाले की, “राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी करत आहेत. सावरकर हे हिंदुत्ववादाचे प्रणेते आहेत त्यामुळे त्यांना विरोध केला तर मुसलमान आपल्या पाठीशी उभे राहतील अशा रितीने ते प्रयत्न करत आहेत. काही हिंदुत्ववादी पक्ष जे कॉंग्रेससोबत होते, ते पक्ष सुद्धा अंतर्गत राजकारणासाठी सावरकरांचा वापर करत आहेत असा राजकीय फायद्यासाठी सावरकरांचा वापर करणे योग्य नाही.”

“आजच संजय राऊत म्हणाले, गद्दारांना सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा मिळवून द्यायला प्रयत्न केले, त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले तसेच त्यांनी मणिशंकर अय्यरला जोडे मारो आंदोलन सुद्धा केलं. बाळासाहेबांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचा वारसा घेत, त्यांचे नाव सांगत संजय राऊत म्हणाले सावरकर आमचेच आहेत हा त्यांचा दावा अत्यंत दुर्दैवी आहे”, असे रणजित सावरकरांनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे भेटले नाहीत, माझ्या पत्रालाही उत्तर दिले नाही – रणजित सावरकर

“तत्कालीन विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक हे सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष होते. त्यामुळे सावरकरांचा आदर करणारे लोक कॉंग्रेसमध्येही आहेत परंतु दुर्दैवाने आजही ते सावरकरांसाठी आवाज उठवणार नसतील, काही कृती करणार नसतील तर त्याला काहीही अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी मालेगावमध्ये सावरकरांविषयी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह असली तरी कॉंग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकातून वीर सावरकरांवर जी टीका करण्यात आली होती यासंदर्भात ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना पत्र लिहून मागणी केली होती, त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी माझ्या पत्रालाही उत्तर दिले नव्हते, ते कॉंग्रेसवर बदनामीची कारवाई करू शकले असते. शरद पवारांची ज्या अभिनेत्रीने बदनामी केली तिला एक महिना जेलमध्ये पाठवले होते. मग वीर सावरकरांवर अश्लील भाषेत टीका केली त्याचे काय?” असा जाहीर सवाल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणे हे अत्यंत आवश्यक आहे. आज राहुल गांधी केवळ गप्प बसले म्हणून उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी राहुल गांधींना माफ न करता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडलं पाहिजे, तेव्हाच ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेला अर्थ प्राप्त होईल. तसेच सावरकरांनी माफी मागितली याचे पुरावे दाखवा असे आव्हान सुद्धा रणजित सावरकरांनी राहुल गांधींना दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.