आता जावई आणि सासरे मिळून चालवणार महाराष्ट्राचे विधिमंडळ

175
आता जावई आणि सासरे मिळून चालवणार महाराष्ट्राचे विधिमंडळ

सुहास शेलार

अजित पवार यांनी ४० आमदारांसह युती सरकारला पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्याचे पडसाद विविध टप्प्यांवर उमटताना दिसत असले तरी, शिंदे-फडणवीस आणि पवारांच्या युतीमुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात अभूतपूर्व योग जुळून येऊ घातला आहे. तो योग म्हणजे, जावई आणि सासरे मिळून महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा आणि विधानपरिषद) चालवताना दिसणार आहेत.

सध्या विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे गेल्या तीन अधिवेशनांत सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली नव्हती. मात्र, आता अजित पवार यांना विधानपरिषदेच्या ६ आमदारांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे युतीचा आकडा महाविकास आघाडीपेक्षा अधिक झाला आहे. परिणामी, येत्या पावसाळी अधिवेशनात सभापती पदाची निवडणूक घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – https://www.marathi.hindusthanpost.com/politics/maharashtra-politics-ramraje-nimbalakar-and-ram-shinde-who-will-be-speaker-of-the-legislative-council/)

विधानपरिषदेचे सभापतीपद राष्ट्रवादीला सोडण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर या पदासाठी इच्छुक आहेत. त्याच अटीवर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात रामराजे निंबाळकर यांची सभापती पदावर निवड झाल्यास जावई आणि सासरे मिळून महाराष्ट्राचे विधिमंडळ चालवताना दिसतील. रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

सभापतीची निवड कशी होते?

– सभापतींचे पद रिक्त असेल अथवा रिक्त होण्याच्या बेतात असेल तेव्हा राज्यपाल सभापतींची निवडणूक घेण्याकरिता तारीख ठरवितात. त्याची सूचना सर्व सदस्यांना देण्यात येते.
– निवडणुकीच्या तारखेच्या एक दिवस अगोदर दुपारी १२ वाजेपर्यंत प्रधान सचिवांना कोणताही सदस्य दुसऱ्या एखाद्या सदस्याचे नाव सभापती पदाकरिता प्रस्तावाच्या सूचनेद्वारे सुचवू शकतो व त्यास आणखी एका सदस्याचे अनुमोदन आवश्यक असते.
– तसेच ज्या सदस्याचे नाव सुचविण्यात आले असेल त्यांच्याकडून तो निवडून आल्यास सभापती म्हणून काम करण्यास तयार आहे असे निवेदनदेखील प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे.
– प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी प्रस्तावांच्या क्रमांकाने कामकाज पत्रिकेवर प्रस्ताव दर्शविण्यात येतात व ते त्याच क्रमाने सभागृहात मांडण्यात येतात.
– त्यानंतर मांडलेल्या क्रमाने प्रस्ताव मतास टाकण्यात येतात. पहिलाच प्रस्ताव संमत करण्यात आल्यास इतर प्रस्ताव मतास टाकण्यात येत नाहीत. अशा रीतीने प्रस्तावित केलेल्या सदस्यास सभापती म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात येते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.