-
कल्याण : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्याने शनिवारी संपूर्ण शहरात राजकीय वातावरण निर्माण झाले होते. डोंबिवलीतील (Dombivli) प्रगती कॉलेज हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीला पदाधिकारी आणि राजसैनिकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. राज ठाकरे येणार म्हटल्यावर हॉल खचाखच भरला होता. कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि जोश दिसत होता. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित पदाधिकारी आणि राजसैनिकांशी अत्यंत मोकळेपणाने आणि थेट संवाद साधला.
राज ठाकरे यांनी या बैठकीत कुणालाही मध्यस्थ न ठेवता त्यांनी प्रत्येकाची मते ऐकून घेतली. पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी मजबूत करायची, आगामी काळात पक्षाची दिशा काय असणार, स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर कशी भूमिका घ्यायची, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीत राज ठाकरे यांनी राजसैनिकांमध्ये नवा उत्साह आणि नवी ऊर्जा भरली. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात त्यांनी दिलेले कानमंत्र ऐकून पदाधिकाऱ्यांमध्येही नवे बळ आले. डोंबिवलीतील संघटनात्मक कामाचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. जिथे कमतरता आहे तिथे ती दूर करून संघटना अधिक भक्कम करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
(हेही वाचा – IPS Transfers : पोलीस दलात मोठी खळबळ! ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी)
दरम्यान या दौऱ्याचा दुसरा टप्पा आता कल्याणमध्ये (Kalyan) रंगणार आहे. रविवार सकाळी १० वाजता कल्याण येथील स्प्रिंग टाईम हॉटेलमध्ये पदाधिकारी व राजसैनिकांची बैठक होणार आहे. या बैठकीतही राज ठाकरे पदाधिकारी आणि राजसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. कल्याणमधील राजसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्येही या बैठकीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांतील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेणे. पदाधिकारी व राजसैनिकांशी थेट संवाद साधणे आणि आगामी काळातील पक्षाची दिशा व रणनीती निश्चित करणे, या दृष्टीने राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. या दौऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या संघटनेला नवी दिशा आणि नवी ताकद मिळणार असल्याची चर्चा राजसैनिकांमध्ये रंगली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

