पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना: देशाची प्रतिष्ठा वाढणार; न्यूयॉर्कमध्ये योगा करणार

पीएम मोदींसोबत मंत्र्यांची एक टीम आणि व्यापारी शिष्टमंडळही अमेरिकेला जाणार आहे.

122
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना: देशाची प्रतिष्ठा वाढणार; न्यूयॉर्कमध्ये योगा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे. या भेटीसाठी अमेरिकेने आमंत्रित केलेले ते आतापर्यंतचे दुसरे भारतीय पंतप्रधान आणि तिसरे मोठे नेते आहेत. यापूर्वी १९६३ मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि २००९ मध्ये मनमोहन सिंग हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यामुळेच पंतप्रधान मोदींच्या मागील ७ अमेरिका दौऱ्यांच्या तुलनेत ही भेट खूप खास आहे.

यादरम्यान ते ७२ तासांत १० कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून न्यूयॉर्कमध्ये योगा करणार आहेत. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, भारत-अमेरिकेचे घनिष्ठ संबंध आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात आमची भागीदारी सातत्याने वाढत आहे. अमेरिका वस्तू आणि सेवांमध्ये आमचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. याशिवाय, आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि संरक्षण क्षेत्रात भागीदार आहोत. इंडो-पॅसिफिक मुक्त करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.

मोदी म्हणाले – राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि इतर अमेरिकेच्या नेत्यांशी माझी चर्चा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी पुढे नेईल. मला विश्वास आहे की माझ्या अमेरिका भेटीमुळे लोकशाही, विविधता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित आमचे संबंध अधिक दृढ होतील. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही एकत्र उभे आहोत.

(हेही वाचा – महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

पीएम मोदींसोबत मंत्र्यांची एक टीम आणि व्यापारी शिष्टमंडळही अमेरिकेला जाणार आहे. शिष्टमंडळात आयटी, संरक्षण, एव्हिएशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध क्षेत्रातील लोक असतील.

मंत्र्यांच्या टीममध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची उपस्थिती निश्चित असल्याचे मानले जात आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण, तंत्रज्ञान, धोरणात्मक आणि व्यावसायिक सौदे होतील. पंतप्रधान मोदी २० अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंनाही भेटणार आहेत.

पीएम मोदींची ही भेट किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, पंतप्रधानांच्या जाण्याआधी १५ दिवसांत अमेरिकेचे दोन मोठे नेते भारतात आले आहेत.

तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले होते की, दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर करार झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान याची घोषणा केली जाईल.

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०२२-२३ या आर्थिक वर्षात $१२८ अब्ज ओलांडला आहे. म्हणजेच या मध्यांतरात भारत आणि अमेरिकेने १० लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय केला.

अमेरिका अशा मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याशी भारताचा व्यापार अधिशेष आहे. म्हणजेच भारत अमेरिकेला जास्त माल विकतो आणि तिथून कमी माल घेतो. २०२१-२२ मध्ये, भारताचा अमेरिकेसोबत ३२.८ अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष होता. भारताला हा व्यापार अधिशेष कायम ठेवायचा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा आहे.

सामरिक आणि मुत्सद्दी दृष्ट्याही ही भेट विशेष आहे. वास्तविक, चीनच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेची चिंता जवळपास सारखीच आहे. LAC आणि हिंदी महासागरात चीनच्या हस्तक्षेपाला भारताचा विरोध आहे.

त्याचबरोबर तैवान आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांनाही अमेरिका विरोध करत आहे. अशा परिस्थितीत चीनशी सामना करण्यासाठी दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे. याशिवाय, पंतप्रधानांच्या या भेटीत भारताला जगातील सर्वात प्रगत MQ-9 ड्रोन आणि फायटर जेट इंजिन बनवण्यासाठी अमेरिकेकडून ११ तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे.

याआधी पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची ६ वेळा भेट घेतली आहे. त्यांची पहिली बैठक सप्टेंबर २०२१ मध्ये अमेरिकेत झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये व्हाईट हाऊसमध्ये सुमारे ९० मिनिटे चर्चा झाली.

त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इटलीत झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि बायडेन यांची भेट झाली होती. दोन्ही नेत्यांची पुढील बैठक मे २०२२ मध्ये क्वाड शिखर परिषदेदरम्यान झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.