मराठा आरक्षण की राजकीय स्वार्थ?

मेटेंचे आंदोलन हे समाजाचे नसून, ते भाजपचे असल्याची भावना समाजाच्या एका गटात आहे.

109

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेले असताना, आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी बीडमध्ये सभा घेतली. मात्र यावेळी या दोन्ही नेत्यांचा सूर हा महाविकास आघाडीला टार्गेट करण्याचाच होता. त्यामुळे आता हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले नेते खरच मराठा आरक्षणासाठी उतरले, की राजकीय स्वार्थासाठी? असा प्रश्न मात्र उपस्थित होऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे मेटेंचे आंदोलन हे समाजाचे नसून, ते भाजपचे असल्याची भावना समाजाच्या एका गटात असून, भाजप या मोर्च्यांतून राजकीय स्वार्थ साधून, समाजाचा पुन्हा वापर करत नाही ना? असा संशय काही मराठा समजातील तरुण उपस्थित करू लागले आहेत.

फडणवीस यांची स्तुती, चव्हाणांवर टीका

अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिले ते ही चुकीचे दिले, त्याची फळे आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण अतिशय चांगले होते. पण या माणसाच्या मूर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे आपण ते घालवले, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी चव्हाण व ठाकरे सरकारवर केला.

(हेही वाचाः आता भाजपचे मिशन ‘मराठा’! )

चव्हाणांची हकालपट्टी करा

इतकंच नाही तर मराठा समाजाला सवलती द्या आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या, त्यासाठी 5 जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर 7 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशाराही मेटे यांनी दिला. तसेच काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास, अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणाच मेटे यांनी बीडमधून केली आहे.

नरेंद्र पाटलांची तर उडवण्याची धमकी

सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकीकडे विनायक मेटे यांनी सरकार विरोधात टीका केल्यानंतर, त्यांच्याच व्यासपीठावर नरेंद्र पाटील यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले. तुमच्यासारखा जातीवंत माणूस आणि कट्टर मराठा आयुष्यात शांत बसणार नाही. वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

(हेही वाचाः आता संभाजी राजेंचा एल्गार, पहिला मोर्चा 16 जूनला)

काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरक्षणाला विरोध

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचे वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे. स्व.अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिल्यानंतर देखील हा प्रश्न आजपर्यंत कायम आहे. याला कारणीभूत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असल्याची टीका, नरेंद्र पाटील यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.