बोलका हा दुरावा… शिवसेनेला वाटतेय हिंदुत्वाचा मुद्दा गमावण्याची भीती!

148
महाराष्ट्रात सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारांच्या भाजपाला बाजूला करून निधर्मीवादी दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, त्यानंतर जेव्हा जेव्हा भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. तेव्हा शिवसेनेने ‘आमचे हिंदुत्व बेगडी नाही’, असा दावा केला. परंतु आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला, तेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, म्हणूनच देशात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात देशभरातील विरोधकांनी संयुक्त निवेदन पंतप्रधानांना दिले, त्यावर शिवसेनेने स्वाक्षरी करणे टाळले आहे. शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा गमावण्याची भीती वाटते म्हणून सेनेने स्वाक्षरी करण्याचे टाळले आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
विरोधी पक्षांच्या या संयुक्त निवेदनावर देशातील १३ प्रमुख विरोधी पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या निवेदनातून शिवसेना जाणीवपूर्वक गायब झाली आहे. जातीय हिंसाचारावर  चिंता व्यक्त करणारे हे निवेदन विरोधी पक्षांनी जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जातीय-धार्मिक हिंसेवर बाळगलेल्या मौनाबद्दलही या निवेदनात सवाल उपस्थित करण्यात आला आहे. देशात नागरिकांनी शांतता आणि सौहार्द कायम राखावे, असे आवाहन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निवेदनात केले आहे.

कोणी केल्या स्वाक्षऱ्या? 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या निवेदनावर स्वाक्षरी नाही.

हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह, सेनेचा बचावात्मक पवित्रा 

शिवसेनेने भाजपपासून दूर होऊन दोन्ही काँग्रेसशी जुळवून घेतल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. ज्या ज्या वेळी हिंदुत्वाची बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा शिवसेना सत्तेतील सहकारी पक्षांची नाराजी ओढवून घेता येऊ नये म्हणून हिंदुत्वाच्या भूमिकेला बगल दिली. मात्र आता राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यासाठी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला आहे. तेव्हापासून सेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपल्या हातून हिंदुत्वाचा मुद्दा कायमचा निसटून जाऊ नये याची खबरदारी म्हणून सेनेने देशभरातील हिंसाचाराच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांनी जे संयुक्त निवेदन दिले त्यावर स्वाक्षरी केली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.