-
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य बंडखोरीची चर्चा सुरू असतानाच, केंद्र सरकारने (Central Govt) या सर्व खासदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सहाही खासदारांना ‘Y+’ सुरक्षा पुरवण्यात आली असून, राज्य गुप्तचर विभागाने (SID) तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता, या निर्णयाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले जात आहे. या सुरक्षा व्यवस्थेनुसार, संबंधित खासदारांच्या निवासस्थानी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात असेल, तसेच त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी विशेष पथक सोबत असणार आहे.
(हेही वाचा – ‘ऑपरेशन’चा इशारा नेमका कुणासाठी?; BJP चा शिवसेना उबाठावर जोरदार हल्लाबोल)
जिल्हानिहाय सुरक्षा आढावा
- हिंगोली: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात येताच त्यांना तातडीने ‘Y+’ सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.
- परभणी: खासदार संजय जाधव (Sanjay jadhav) यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गृह विभागाच्या सूचनेनुसार ही कार्यवाही झाली आहे.
- यवतमाळ: खासदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांच्या दिग्रस येथील निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांचा मोठा पहारा आहे.
- ईशान्य मुंबई: खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) सध्या दिल्लीत असून, त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
- शिर्डी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्या ‘साई अर्पण’ निवासस्थानी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला आहे. स्थानिक शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी शिर्डी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.
ठाकरे गटाने आज दिल्लीत बोलावलेली संसदीय बैठक या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत संबंधित खासदार उपस्थित राहणार का आणि राजकीय भूमिकेबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंडखोरीच्या चर्चा आणि सुरक्षेतील वाढ यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

