नारायण राणे – शिवसेना आमनेसामने! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून राजकारण पेटले! 

नारायण राणे यांनी जरी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, तरी शिवसेना त्यांना तीव्र विरोध करणार आहे.

77

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे हे हेदेखील त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात थेट मुंबईतून करणार असून शिवसेनेचा बाल्लेकिल्ला दादर येथेही ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यावेळी राणे हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत, मात्र ‘शिवसेना फोडणाऱ्या बेईमान नेत्याला स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊ देणार नाही’, अशी भूमिका घेत शिवसेना राणेंना विरोध करणार आहे.

यात्रेच्या मार्गातून वरळी मतदार संघ वगळला! 

केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई विमानतळावरून विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे या मार्गाने दादर येथे येणार आहेत. त्यानंतर राणे हे आधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र राणे यांच्या या यात्रेच्या मार्गातून पुढे वरळी मतदार संघ वगळण्यात आला आहे. वरळी मतदार संघाचे आमदार हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे राणे यांनी नेमका हाच मतदार संघ का वगळला, यावर आता चर्चा सुरु झाली आहे.

नारायण राणेंचे बॅनर हटवले!

मुंबई महापालिकाने माहिम, शिवाजी पार्क भागात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा देणारे बॅनर हटवले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले, अशा प्रक्रारे शिवसेनेने राणे यांना विरोध करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष राणे जेव्हा दादर येथे पोहचतील, तेव्हा नारायण राणे आणि शिवसेना आमनेसामने येणार आहेत.

(हेही वाचा : नारायण राणे प्रथमच करणार बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन)

शिवसेनेची विरोधाची तयारी! 

नारायण राणे यांनी जरी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, तरी शिवसेना त्यांना तीव्र विरोध करणार आहे. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली, घर फोडले. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या राणेंमुळे शिवसेनाप्रमुखांना त्रास झाला आहे. त्यामुळे शिवसेना ही कदापि राणेंना स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मांडली. तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र शिवसेनेच्या विरोधाचा खरपूस समाचार घेतला. शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळ हे काही कोणत्या खासगी कंपनीची मालमत्ता नाही. त्यामुळे एखाद्याला स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊ द्यायचे नाही, इतक्या कोत्या मनाची महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शक्तीप्रदर्शन

दरम्यान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आढावा घेण्यासाठी विमानतळावर पोहचले आहेत. त्यांनी राणे यांच्या यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. दरम्यान येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नारायण राणे यांच्या या जन यात्रेचा मुंबईत अधिकाधिक फायदा करून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा राहिली आहे. आता खुद्द राणे शिवसेनेच्या अंगणात येत आहेत. आज राणे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर कोणत्या शब्दात हल्लाबोल करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.