Mumbai Riots : जरांगे-पाटलांचा मुंबईत ३ कोटी जमाव जमवण्याचा इशारा; यापूर्वी कोणकोणत्या आंदोलनांमुळे हादरलेली मुंबई?

272
  • नित्यानंद भिसे

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे जरांगे पाटलांनी २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारनेही १८ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू केली आहे. बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत लाखोंच्या जनसमुदायासमोर जरांगे पाटलांनी या आंदोलनाची घोषणा केली. जर मुंबईत या आंदोलनाचे लोण पसरले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरे तर कोणतीही मागणी मान्य करून घ्यायची असेल अथवा एखादा विषय सरकार दरबारी पोहचवायचा असेल तर मुंबई हे सगळ्या पक्ष, संघटना यांचे शेवटचे हत्यार असते. देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईत होणारी आंदोलने, मोर्चे, संप यांची देशभर चर्चा होते. आजवर मुंबईत झालेले मोर्चे, आंदोलने यामुळे कधी मुंबई पेटली तर कधी ठप्प झाली. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन मुंबईत धडकणार आहे. त्याचे कसे पडसाद मुंबईत उमटतात हे पहावे लागेल, मात्र जरांगे पाटलांच्या या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे मुंबईत आजवर झालेल्या आंदोलनांची ज्याने अवघ्या मुंबईवर परिणाम झाला त्याचे स्मरण होण्यावाचून राहत नाही.

शिवसेनेच्या सीमाप्रश्नावरून मुंबई ‘भडकलेली’ 

१९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात उडी घेतली. सीमाप्रश्न पेटलेला असतानाच ७ फेब्रुवारी १९६९ रोजी तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या गाड्यांचा ताफा मुंबई विमानतळावरून माहीमच्या नाक्यावरून दादरच्या दिशेने निघाला होता. तिथून तो मलबार हिलच्या दिशेने जाणार होता. या दरम्यान देसाई यांना निवेदन देण्याचा शिवसेनेच्या नेत्यांनी ठरवले. त्यादिवशी सकाळीच बाळासाहेबांनी मुंबई पोलिस आयुक्त इमॅन्युएल मोडक यांची भेट घेऊन ‘आमचे आंदोलन शांततापूर्ण असेल’, अशी ग्वाही दिली होती. पण पोलिस बंदोबस्त कडक करण्याचे आदेश आधीच पोलिसांना देण्यात आले होते. मोरारजींच्या गाड्यांचा ताफा माहीमच्या नाक्याजवळ आला. शिवसैनिकांनी मोरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी लाठीमार सुरु केला. कोणत्याही परिस्थितीत गाडी थांबवायची नाही, असे पोलिसांनी ठरवले आणि काही शिवसैनिकांना चिरडत मोरारजी देसाईंची गाडी पुढे निघून गेली. याचा परिणाम म्हणून अख्ख्या दादरमध्ये दंगलीला (Mumbai Riots) सुरुवात झाली. दादरमधल्या रानडे रोड, कॅडल रोडवरच्या पोलीस चौक्या पेटवण्यात आल्या. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे अख्खी मुंबई हादरली आणि त्याचे पडसाद दिल्लीत उमटले.

(हेही वाचा Delhi Riot charge sheet : दिल्लीतील हिंदुविरोधी दंगलीत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, उमर खालिद आणि शरजील इमामचा सहभाग?)

बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई थांबवली 

मुंबईत ७०च्या दशकात कामगारांचा नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस प्रसिद्ध होते. कधीही बंद न पडणारी मुंबई जॉर्ज फर्नांडिस यांनी एका हाकेत बंद पाडली. तेव्हापासून त्यांचा ‘बंद सम्राट’ म्हणून उल्लेख होऊ लागला. वर्ष होते १९७४. फर्नांडिस त्यांच्या नेतृत्वात रेल्वे कामगारांच्या मागण्यांसाठी 1974 ला रेल्वेचा देशव्यापी संप पुकारण्यात आला. या संपाची सुरुवात मुंबईमधून झाली. 8 मे रोजी रेल्वे चक्का जाम करण्याची घोषणा फर्नांडिस यांनी केली. त्यानंतर कामगार नेत्यांना अटक करण्यात आली. मुंबईतून रेल्वे कामगार नेत्यांपैकी मामा मळगी आणि त्यांचा मुलगा सुभाष मळगी यांना 2 मेच्या पहाटे पकडण्यात आले. त्याच दुपारी मामा मळगी यांचा कोठडीतच आपल्या मुलाच्या मांडीवर हृदयविकाराने मृत्यू झाला. पण पोलिसांनी मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामगार भडकले. जॉर्ज आणि अन्य नेत्यांनाही 2 मे रोजी अटक झाली. त्यामुळे 8 मेपासून रेल्वे बंदची हाक देण्यात आली. मुंबईतून सुरु झालेला रेल्वेचा संप देशभर पसरला. 20 लाख कामगार संपावर गेले. देशाची रेल्वे जागच्या जागी थांबली.

गिरणी कामगारांनी मुंबईचा ‘भोंगा’ कायमचा बंद केला 

मुंबईच्या गिरण्या मुंबईतल्या अनेक तरुणांच्या रोजगाराचे साधन बनली. पण तेव्हा गिरण्यांमध्ये मिळणारा पगार अपुरा होता. त्यामुळे पगारवाढ हा गिरणी कामगारांच्या आंदोलनाचा पाया होता. या मागण्यांसाठी अडीच लाख कामगारांनी डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात संप सुरू केला. गिरणगाव अशी ओळख असलेल्या मुंबईतील गिरण्या ठप्प झाल्या. त्यामुळे इतर उद्योगांवर सुद्धा त्याचा मोठा परिणाम झाला. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या या आंदोलनामुळे देशभरातले वातावरण तापले. जवळपास दोन वर्ष चाललेला हा संप भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा संप समजला जातो. गिरणी कामगारांचे हे आंदोलन पुढे अयशस्वी झाले. अनेक मराठी तरुण बेरोजगार झाले. या आंदोलनाची झळ मुंबईतल्या मराठी माणसाला बसली.

बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबई रक्त्तरंजित झाली 

१९९२ ची दंगल मुंबईच्या इतिहासातून कधीच पुसली जाणार नाही. ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तर प्रदेशातील बाबरी मशिदीचा ढाचा जमीनदोस्त करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंपचे हे श्रीराम मंदिर आंदोलन देशभर पेटले होते. कधी नव्हे ते हिंदू समाज एकवटला होता. बाबरी पडल्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही दंगली सुरु झाल्या. मुंबईत जेव्हा ही दंगल पेटली  (Mumbai Riots) तेव्हा कधी नव्हे ते हिंदू-मुसलमान वैर मुंबईने पाहिले. दोन टप्प्यात ही दंगल झाली. पहिल्या टप्प्यात जेव्हा ही दंगल झाली तेव्हा मुसलमानांनी मोठ्या संख्येने हिंदूंना ठार केले, त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना आवाहन केले आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या दंगलीत पुन्हा मुंबई पेटली. या जातीय दंगलीने मुंबईत दोन आठवडे संचारबंदी लागू करण्यात आली होती.

(हेही वाचा Maratha Reservation : मराठा आंदोलनाआड देशविघातक शक्ती काम करण्याचा धोका)

धर्मांध मुसलमानांनी मुंबईला वेठीस धरले 

मुंबईत आणखी एक आंदोलन झाले ज्याला हिंसक वळण आले. आसाम आणि म्यानमारमध्ये मुस्लिमांवर झालेल्या कथित अत्याचारांच्या विरोधात ११ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर रजा अकादमीकडून एक मोर्चा काढण्यात आला होता. रजा अकादमीच्या धर्मांध मुसलमानांनी त्यावेळी पोलिसांवर हल्ला केला होता. मोर्च्याची पोलिसांकडून परवानगी घेताना अवघे १ हजार जण येतील असे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात ४० हजारांपेक्षा जास्त जमाव आला. त्यांनी पोलीस आणि प्रसारमाध्यमांवर हल्ले केले, वाहने जाळली. अमर जवान ज्योती स्मारकाची तोडफोड केली. अशा प्रकारे २.७२ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे यावेळी नुकसान झाले. रजा अकादमीच्या या हिंसक आंदोलनामुळे तेव्हा मुंबईत दंगलसदृश्य (Mumbai Riots) स्थिती निर्माण झाली होती. मुंबईला वेठीस धरले होते. मुंबईत धर्मांध उन्मादामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी अरुप पटनायक हे मुंबईचे पोलिस आयुक्त होते. या घटनेनंतर पटनायक यांची बदली करण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.