राज्याला मुख्यमंत्री नाही, मख्खमंत्री आहे; संजय राऊतांचा शिंदेंवर घणाघात

34

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करून ब्लॅकमेल करण्यात आल्याच्या प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मख्खमंत्री म्हणत त्यांच्यावर घणाघात केला. तसंच मुख्यमंत्री राहूल कुल प्रकरणावर का बोलत नाहीत? असा सवालही केला.

नक्की काय म्हणाले राऊत? 

शुक्रवारी सकाळी प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहेत. या राज्याला मख्खमंत्री आहे. सगळं काही मख्खपणे चाललं आहे. मुख्यमंत्री असता तर राज्याची अशी अवस्था नसती. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यात फरक आहे. म्हणून सगळी सूत्र जी आहेत, ती उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतायत. बाकी काही करत नाही.’

तसंच अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणाविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ‘त्या विषयावर बोलणं बरं नाही, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. आणि भारतीय जनता पक्षाला जशी कुटुंबात घुसण्याची सवय आहे, तशी आम्हाला नाही. आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर काही संस्कार आहेत. प्रकरण पोलिसात आहे, पण जर गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंगचं प्रकरण गेलं असेल तर ते गंभीर आहे.’

नाकाने कांदे सोलू नका; राऊतांचा फडणवीसांना टोला

दरम्यान अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मविआतील काही अधिकाऱ्यांच्या समावेश असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर राऊत म्हणाले की, ‘आमच्याकडे बोटं करताना स्वतःवर काही बोटं आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. मी परत सांगतो, हा तुमचा कौटुंबिक विषय आहे, आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. माझ्यावरती बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत, ते मी कायम पाळतो. ब्लॅकमेलचं प्रकरण काय आहे, यासंदर्भात पोलिसांनी तपास करावा. आमचा सुद्धा तपास होऊ शकतो, आम्ही सुद्धा राजकारण, समाजकारणामध्ये आहोत.’

‘पण महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, एखाद्या महिलेला अशाप्रकारे ब्लॅकमेल केलं जाऊ नये. मग त्या कोणीही असो, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतील, उपमुख्यमंत्र्यांचा पत्नी असतील किंवा सामान्य महिला असेल. ज्या अर्थी अशी घटना घडते त्या अर्थी पोलिसांना कायद्याचा धाक राहिला नाही. किंवा पोलिसांवर राजकीय दबाव आहे. जर गृहमंत्र्यांच्या घरी कोणी व्यक्ती जात-येत असेल, त्याच्यामध्ये मविआचा काय संबंध? नाकाने कांदे सोलू नका. तुम्ही मविआवर खापर फोडताय. काय होतास तू काय झालास तू,’ असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला.

(हेही वाचा – बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? राज ठाकरे की एकनाथ शिंदे; संजय राऊतांनी काय दिले उत्तर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.