आमदार लांडगेंनी मुलीचा विवाह मंदिरात उरकला!

वास्तविक, हा विवाह सोहळा ६ जून रोजी राजस्थान किंवा गोवा येथे होणार होता.

104

विवाह समारंभातील मांडव डहाळे कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याची राज्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर आमदार लांडगे यांची कन्या साक्षी आणि व्यावसायिक नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद भोंडवे यांचा विवाह तीर्थक्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मंदिरासमोर सोमवारी, ३१ मे रोजी अत्यंत साधेपणाने पार पडला.

या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल!

भोसरी पोलिस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सचिन लांडगे, अजित सस्ते, कुंदन लांडगे, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी धावडे, सुनील लांडे, नितीन गोडसे, प्रज्योत फुगे यांच्यासह ४० ते ५० लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ३३५ / २०२१ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१, महाकोविड १९ उपाययोजना २०२० कलम ११ आणि भारतीय दंड विधान कलम ५८८, २५९ व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार कारवाई केली आहे.

(हेही वाचा : कोरोनात जनता घरात, राजकारणी मात्र मोकाट! आमदार लांडगेंचा धिंगाणा! )

६ जूनला गोव्यात होणार होता विवाह!

मांडव डहाळे कार्यक्रमात उपस्थितांसोबत ठेका धरल्यानंतर आमदार लांडगे यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले.  तसेच, गर्दी जमवून कोरोना प्रसार होईल, असे वर्तन केले, असा आरोप पोलिसांचा आहे. राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आमदार, खासदार, श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरीबांना वेगळा न्याय का? असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित करण्यात येत होता. वास्तविक, हा विवाह सोहळा ६ जून रोजी होणार होता. राजस्थान किंवा गोवा येथे हा सोहळा पार पडणार होता. मात्र, लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे विवाह सोहळा आयोजित करण्यात मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे मांडव डळाळे ३० मे रोजी मांडव डहाळे आणि ३१ मे रोजी विवाह असे नियोजन करण्यात आले होते.

गुन्हा केला कबूल!

याबाबत आमदार लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे म्हणाले की, मांडव डहाळे समारंभासाठी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली होती. नियमानुसार २५ मोजक्या आप्तेष्ठांना निमंत्रित केले होते. कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही आनंद साजरा केला. मात्र, समारंभ ठिकाणी काही कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित राहिले. त्यामुळे गर्दी निर्माण झाली. कोरोना नियमावली अर्थात सोशल डिस्टंन्सींगच्या नियमाचे उल्लंघन झाले. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे हा आमचा हेतू नव्हता. पोलिस प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे. प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईची पूर्तता आम्ही करणार आहोत. प्रशासनाला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही सचिन लांडगे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.