Thomas Cup 2024 : प्रतिष्ठेच्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा पुरुष संघ बाद फेरीत

Thomas Cup 2024 : भारताच्या पुरुष संघाने इंग्लंडचा ५-० असा पराभव करत बाद फेरी गाठली आहे. 

65
Thomas Cup 2024 : प्रतिष्ठेच्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा पुरुष संघ बाद फेरीत
  • ऋजुता लुकतुके

थॉमस चषक या बॅडमिंटनमधील सांघिक स्पर्धेत गतविजेत्या भारतीय पुरुष संघाने अपेक्षेप्रमाणे बाद फेरीत प्रवेश केला आहे. आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात त्यांनी इंग्लंड संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. यापूर्वी थायलंडला त्यांनी ४-१ असं हरवलं होतं. सलग दुसऱ्या विजयानंतर भारताचा आता उपउपान्त्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. इंग्लंड विरुद्ध भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. (Thomas Cup 2024)

त्यानेच हॅरी हुआंगचा २१-१५ आणि २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. आणि भारताला १-० अशी आघाडी मिळाली. सामन्यानंतर प्रणॉयने चांगल्या सुरुवातीचं महत्त्व पत्रकारांशी बोलताना विशद केलं. ‘पहिल्या सामन्यात विजय हा सांघिक स्पर्धेत महत्त्वाचा ठरतो. संघासाठी तो आत्मविश्वास देणारा ठरतो,’ असं प्रणॉय म्हणाला. त्यानंतर पहिल्या दुहेरीत सात्त्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांना मात्र थोडं झगडावं लागलं. बेन लेन आणि सीन व्हेंडी यांनी हा सामना तीन गेमपर्यंत खेचला. पण, अखेर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या भारतीय जोडीने २१-१७, १९-२१ आणि २१-१५ असा विजय मिळवला. (Thomas Cup 2024)

(हेही वाचा – Marathi Board : कारवाईचा बडगा उगारतच त्या दुकानांनी लावले मराठी नामफलक)

भारताच्या दुसऱ्या एकेरी सामन्यात किदम्बी श्रीकांत या अनुभवी भारतीय खेळाडूने आपला अनुभव पणाला लावत नदीम दळवी या इंग्लंडच्या नवख्या खेळाडूला २१-१५ आणि २१-११ अशी धूळ चारली. या विजयामुळे भारताचा ३-० ने विजय निश्चित झाला होता. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत भारताने नवीन खेळाडूंना संधी दिली. दुसऱ्या दुहेरीत ध्रुव कपिला आणि एम आर अर्जुन यांनी इंग्लंडच्या ॲलेक्स ग्रीन आणि रोरी ईस्टन यांचा २१-१७ आणि २१-१९ असा पराभव केला. तर पाचवा सामना हा एकेरीचा होता आणि तो २४ वर्षीय युवा बॅडमिंटनपटू किरण जॉर्ज खेळला. त्याने कोलन कायनचा २१-१८ आणि २१-१२ असा विजय मिळवत भारताला निखळ विजय मिळवून दिला. भारतीय संघाचा आता तिसरा साखळी सामना बाकी आहे आणि तो इंडोनेशिया विरुद्ध येत्या बुधवारी होणार आहे. (Thomas Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.