MLA Disqualification Case : राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात रंगणार ‘सामना’

163

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अंतिम निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर आता २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या विषयावर पुन्हा सामना रंगणार आहे.

एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना

राहुल नार्वेकर यांनी अंतिम निर्णय देताना एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न करता अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या. यानंतर ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय दिलासा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना शिवसेना पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ संख्याबळ या तीन गोष्टींवर प्रामुख्याने भाष्य केले. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी झालेली निवड आणि पक्षातील निर्णयाचे सर्व अधिकार देणारी पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या १९९९ च्या पक्षघटनेनुसार शिवसेनाप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यांना निर्णयाचे सर्वाधिकार आहेत. शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही दोन्ही पदे वेगवेगळी असून पक्षादेश जारी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, असे सांगून राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला मान्यता दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.