भाजपा गटनेते प्रविण दरेकरांच्या हस्ते मयूर कृषी महोत्सव २०२३ चे उदघाटन

106

मयूर उद्योग समूह, कोल्हापूर आणि डॉक्टर अंकल यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘मयूर कृषी महोत्सव २०२३’ चे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते आणि महाराजा ऑफ नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर राजे मुधोजी भोसले यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ६ जानेवारी रोजी उदघाटन करण्यात येणार आहे. एस. पी. हायस्कूल प्रांगण कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे हा महोत्सव सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.

या कृषी महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश हाळवणकर (भाजपा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), मकरंद देशपांडे (भाजपा संघटक, पश्चिम महाराष्ट्र), सुरेशदादा पाटील (महाराष्ट्र क्रांती सेना, अध्यक्ष), राजे समरजित घाटगे (भाजपा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष) हे उपस्थित राहणार आहेत. तर संजय शिंदे (प्रभारी जिल्हाधिकारी), जालिंदर पांगिरे (जिल्हा कृषी अधिकारी), अपर्णा मोरे -धुमाळ (तहसीलदार), गणेश भोसले (तालुका कृषी अधिकारी, शिरोळ), आशिष चौहाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषद) यांचीही विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती डॉ. संजय पाटील, समन्वयक भाजपा पश्चिम महाराष्ट्र यांनी दिली.

( हेही वाचा: धक्कादायक: 200 दशलक्ष ट्वीटर युजर्सचा डेटा चोरीला; ईमेल आयडी लीक )

या कृषी महोत्सवात शेतीतील बदलणारे तंत्र, आधुनिक अवजारे, पाण्याचे नियोजन, सेंद्रिय शेतीचे महत्व, बियाण्यांच्या विविध जाती, सौर ऊर्जेचे महत्व तसेच महाराष्ट्र शासनाच्या शेती विषयक वेगवेगळ्या योजना, बँकांचे अर्थसहाय्य, विमा, पीक विम्याची माहिती, शैक्षणिक संस्थांची माहिती, वैद्यकीय तसेच पशु वैद्यकीय सेवांची परिपूर्ण माहिती व उपलब्धता यासह अनेक मुद्द्यांवर भर देण्यात आली आहे. १५० हून अधिक स्टॉल, शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सेमिनार, कृषी कर्जाबाबतची माहितीही या महोत्सवाच्या माध्यमातून उत्पादक व शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.