
- विशेष प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा बैठकीदरम्यान मातोश्रीवर सोमवारी अनपेक्षित घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नियुक्त्या आणि काही पदाधिकाऱ्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून बैठकीत मतभेद उफाळल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने बोलावलेल्या बैठकीतच काही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा (Kalwa) परिसरातील पदवाटप, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि अलीकडेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाले. या विषयावर दोन्ही बाजूंचे नेते आपापली भूमिका ठामपणे मांडत असताना बैठकीतील वातावरण तापल्याचे सांगितले जाते.
(हेही वाचा – Prashant Kishor यांच्या विजयाने बिहारमध्ये कोणाची राजकीय समीकरणे बिघडणार?)
या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्षातील अंतर्गत वाद बाजूला ठेवून संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांनी एकजूट दाखवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. पक्षातील गटबाजी आणि परस्परांतील वाद संघटनेच्या हिताचे नसल्याचेही त्यांनी उपस्थितांना सुनावल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बैठकीनंतर उपस्थित काही पदाधिकाऱ्यांना या कथित वादाबाबत विचारणा करण्यात आली असता काहींनी अशा प्रकारची घटना घडल्याचे नाकारले, तर काहींनी या विषयावर भाष्य करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बैठकीत नेमके काय घडले याबाबत विविध चर्चा रंगत असून, पक्षाकडून याबाबत अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
