Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

113

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समोर आले आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचे आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरू होते. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला असून, आश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले.

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंबड तालुक्यातील २२ गावांमध्ये शुक्रवारी बंद पाळण्यात आला. तसेच गेवराई (ता.बीड) तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारून या आंदोलनाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटी गावापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर- सोलापूर महामार्गावर मोर्चा काढला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाइलद्वारे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. शिवाय मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत असल्याचे सांगितले होते. परंतु, जरांगे यांनी आजवर आश्वासनाशिवाय काही हाती पडले नसल्याचे सांगत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या उपोषणाच्या चौथ्या दिवशी १ सप्टेंबर रोजी अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरातील आपेगाव ते हसनापूरपर्यंतच्या २२ गावांनी कडकडीत बंद पाळून आपला सहभाग नोंदविला. शिवाय गेवराई तालुक्यातील अनेक गावांनीही या बंदमध्ये सहभागी होत गावातून अंतरवाली सराटीपर्यंत दुचाकी रॅली काढली होती.

(हेही वाचा Mumbai – Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर नवे संकट; चौपदरीच्या नवीन रस्त्याला तडे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.