-
प्रतिनिधी
Mantralaya Protest शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आता अत्यंत हिंसक आणि धक्कादायक वळण घेतले आहे. आंदोलनाचा गुरुवारी चौथा दिवस असून, तुपकर यांची ढासळती प्रकृती आणि सरकारची उदासीनता यामुळे संतापलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबईत मंत्रालयासमोर आत्मघातकी पवित्रा घेतला आहे. (Mantralaya Protest)
गुरुवारी मंत्रालयासमोरील परिसरात एका कार्यकर्त्याचा हा थरार पाहून पोलीसही हबकले. हा कार्यकर्ता हातामध्ये सुतळी बॉम्बची पिशवी घेऊन चक्क झाडावर चढला. आंदोलनाची तीव्रता दर्शवण्यासाठी त्याने पोलिसांच्या दिशेने सुतळी बॉम्ब फेकायला सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, तो कार्यकर्ता झाडावरूनच राष्ट्रगीत गाऊ लागला. या नाट्यमय आणि तितक्याच धोकादायक प्रकारामुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला होता. (Mantralaya Protest)
(हेही वाचा – मुंबई महापालिकेत Shiv Sena UBT ला मोठा हादरा; नगरसेवकाची खुर्ची धोक्यात आल्याने गणिते बदलणार)
मुंबईतील या आंदोलनासोबतच राज्यभरातही असंतोषाची आग पसरली आहे. बुलढाण्यातील मेहकर आणि हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालये पेटवून देण्याचा प्रयत्न झाला, तर जालना-खामगाव महामार्गावरील टोल नाक्यालाही आगीच्या हवाले करण्यात आले. इतकेच नाही तर खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार पेटवून देण्याचा प्रकार घडल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सर्व घटनांचा संबंध तुपकरांच्या आंदोलनाशी जोडला जात असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (Mantralaya Protest)
कुलाबा पोलीस ठाण्यात आपल्या काही सहकाऱ्यांना विनाकारण अडवून ठेवल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करतील आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना प्रशासनच जबाबदार असेल,” असे तुपकर यांनी बजावले आहे. (Mantralaya Protest)
(हेही वाचा – Jalna School Controversy : खाजगी शाळेत वादग्रस्त पाकिस्तानी गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य; समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल)
दुसरीकडे, आपल्या मुलाची खालावलेली प्रकृती पाहून तुपकरांच्या मातेच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. “सरकार मायबाप असते, पण हे उंटावरचे शहाणे बनले आहेत. माझ्या मुलाची प्रकृती बिघडली, तर हा सरकारचा तळतळाट त्यांना भोवेल आणि हे सरकार टिकणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आता सरकार या आंदोलनाची दखल घेणार की राज्यातील शेतकरी आणखी तीव्र संघर्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mantralaya Protest)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

