NCP : 30 जून रोजीच बंडाची झालेली सगळी तयारी; प्रफुल पटेलांनी सांगितला घटनाक्रम 

91

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवार यांनी केला आहे. तसेच त्यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचेही सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस कसे आहोत? आणि पक्षाच्या संविधानानुसार आम्ही प्रक्रिया कशी पार पाडली याची माहिती दिली. शपथविधीच्या दोन दिवस आधी म्हणजेच 30 जूनला आम्ही पक्षाची बैठक घेतल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

काय म्हणाले प्रफुल पटेल?

‘खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. लोकांपर्यंत सत्य परिस्थिती यायला पाहिजे म्हणून समोर आलो आहोत. 30 जून 2023 ला राष्ट्रवादी पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक लोक उपस्थित होते. ही बैठक देवगिरीला झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप आमदार तिथे उपस्थित होते. दोन्ही सदनाचे होते. राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते. 30 तारखेच्या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते अजित पवार यांना आपला नेता म्हणून तिथे निवडले. त्यामुळे अजित पवारांनी पुढची प्रक्रिया केली’, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

(हेही वाचा Aurangzeb : राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याचे ‘औरंग्या प्रेम’)

‘अजितदादांनी प्रफुल पटेल यांना म्हणजेच मला नॅशनल वर्किंग प्रेसिडंट केले. यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आणि आपण विधीमंडळ पक्ष नेते आहोत असे सूचित केले. प्रतोद म्हणून अनिल भाईदास पाटील यांना नियुक्त केले . विधानपरिषद सभापतींनाही आम्ही कळवले की अमोल मिटकरी विधानपरिषदेचे प्रतोद नियुक्त केले आहे’, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे. ‘बैठकीनंतर त्याच दिवशी आम्ही आमदार आणि इतर मान्यवरांचे प्रतिज्ञापत्र (ऍफिडेविट) निवडणूक आयोगाला दिले आणि याचिका दाखल केली. निवडणूक आयोग आणि स्पीकरपर्यंत हा विषय पोहोचला आहे. आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्हाला चिन्ह मिळाले पाहिजे, अशी मागणी आम्ही या याचिकेत केली आहे,’ असे प्रफुल पटेल म्हणाले.

‘काल दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली, ती राष्ट्रवादीची अधिकृत बैठक नव्हती. अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. कालच्या बैठकीत आलेले सदस्य नियुक्त केलेले आहेत. माझ्या सहीशिवाय नियुक्ती केली गेली आहे. राजकीय पक्ष कोण याचा निर्णय फक्त निवडणूक आयोग घेऊ शकते, म्हणून अजित पवारांनी 30 जूनला याचिका दाखल केली आहे. आम्ही राष्ट्रवादी आहोत, असे घोषित करा असे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे,’ अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.