मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?; शुक्रवारी शपथविधीची तयारी

91
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करून २० दिवस लोटले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने, विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवाय बंडखोर आमदारांच्या गोटातही चलबिचलता वाढली आहे. त्यामुळे अधिक वेळ न दवडता शुक्रवारी २२ जुलैला पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
पहिल्या टप्प्यात १२ मंत्री शपथ घेतील. त्यातील ८ भाजप, तर ४ शिंदे गटातील असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील नावांची प्राथमिक यादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली असून, गुरुवारी रात्री वा शुक्रवारी सकाळी बैठक घेऊन, त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, आशिष शेलार यांच्यासह दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची नितांत गरज आहे. महापूर, शेतीचे नुकसान, आरे कारशेड, नव्या सरकारने विविध प्रकल्पांना दिलेली स्थगिती आणि अन्य प्रश्नावरून विरोधक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. त्यांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी मंत्रिमंडळात अनुभवी माणसे लागतील. शिवाय नव्या मंत्र्यांना पूर्वतयारी करण्यासाठी किमान आठवडाभराचा वेळ द्यावा लागेल. या बाबी लक्षात घेऊन २२ जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याची प्राथमिक यादी तयार झालेली असली, तरी शिंदे गटातील काही आमदारांच्या कुरबुरी वाढल्या आहेत. ‘राजकीय भवितव्याची चिंता न करता आम्ही तुमच्यासोबत आलो. त्यामुळे उचित संधी मिळायला हवी’, अशी मागणी काही आमदारांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एखादे महत्त्वाचे महामंडळ वा अन्य मार्गाने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल. शुक्रवारपर्यंत त्यांची मनधरणी करता आली नाही, तर २२ जुलैचा मुहूर्त पुढे ढकलून २५ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार करावा, यादृष्टीनेही नियोजन केले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.