राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यावरुन गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

78

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घरासमोर तसेच मातोश्रीसमोर जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. यावरुन राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केले आहे. राज्यातील कायदा-व्यवस्था सुरक्षित असून, राष्ट्रपती राजवट लावणं सोपं नसल्याचं म्हटलं आहे.

(हेही वाचाः राणा दाम्पत्यांनी शेअर केला व्हिडिओ; म्हणाले,”शिवसैनिकांकडून गुंडगिरी…”)

काय म्हणाले गृहमंत्री?

भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी होणे हे स्वाभाविक आहे. कारण राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. त्रिपुरामध्ये एखादी घटना घडली तर त्यावरुन महाराष्ट्रात दंगली घडवायच्या. भोंग्यांच्या विषयावरुन राज्यातील दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करायची असे प्रयत्न करण्यात येत आहेत. हे सर्व दाखवून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचल्याचे चित्र निर्माण करुन राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी विरोधक करत आहेत. पण राज्यात राष्ट्रपती राजवट लावणं सोपं नसून, राज्यातील कायदा-सुवयवस्था सुरक्षित असल्याचं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचाः राणा दाम्पत्यांना नोटीस, मग शिवसैनिकांना का नाही?)

हनुमान चालिसा घरात वाचावी

राणा दाम्पत्याने राज्यातील पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह करत गृहमंत्र्यांना सवाल केला होता. त्यावर बोलताना, राणा दाम्पत्याच्या कुठल्याही प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छित नाही. पण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री अशा बाबतीत पोलिसांना वेगळे आदेश देत नाहीत. हे सर्व निर्णय पोलिस आयुक्तांच्या हातात असून त्यांच्याकडून कारवाई करण्यात येते. आणि त्याप्रमाणे मुंबई पोलिस आयुक्त कारवाई करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. आता हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती आपल्या अमरावती, मुंबई किंवा दिल्लीतील घरी वाचावी, पण मातोश्रीवरच ती वाचण्याचा हट्ट कशासाठी, असा खोचक सवालही गृहमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला विचारला आहे.

(हेही वाचाः “…तर याद राखा”, राऊतांचा राणा दाम्पत्यांना इशारा)

मुंबई आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुरक्षित आहे. पण काही लोक ती बिघडली आहे हे दाखवण्याचा वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसैनिकांनी छेडलेल्या आंदोलनामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं म्हणता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.