
- विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सोमवार, २२ जून २०२६ पासून सुरू होत असून, यावेळी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर एक क्रांतीकारक बदल पाहायला मिळणार आहे. प्रशासनाने या अधिवेशनासाठी पारंपारिक छापील प्रवेश पत्रिका (पास) पूर्णपणे बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. आता माननीय पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी, कर्मचारी, स्वीय सहायक ते अगदी माध्यम प्रतिनिधींपर्यंत प्रत्येकाला विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी केवळ “चेहरा पडताळणी पध्दती” (Face Recognition System) या नव्या ई-प्रवेश प्रणालीचा वापर करावा लागणार आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde : ‘हा फक्त ट्रेलर आहे…’; शिंदेचा विरोधकांना टोला, ‘ऑपरेशन तुडवा’वरही जोरदार पलटवार)
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधान भवन परिसरातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि सुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षम व गतिमान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे केली जाणार असून, कोणत्याही अपवादाशिवाय सर्वांना या प्रणालीतूनच जावे लागणार आहे.
सचिवालयाने या प्रणालीची तयारी पूर्ण केली असून, ऑनलाइन स्वरूपात माहिती नोंदवण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांसाठी शनिवार व रविवार (२० आणि २१ जून) या सुटीच्या दिवशीही हे काम सुरू राहणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पूर्णतः अवलंबला जात असल्याने, सर्वांनी या नव्या प्रणालीचे सहर्ष स्वागत करत सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
