संघ आणि विहिंपच्या नेत्यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला; Lt. Col. Purohit यांचा गौप्यस्फोट

29 ऑक्टोबर 2008 रोजी आपल्याला अटक करण्यात आली होती, तरीही एटीएसने मला अटक झाल्याचे दाखवले नाही, असे पुरोहित म्हणाले.

110

‘मालेगाव बॉम्बस्फोटाची जबाबदारी मी घ्यावी, असा करकरे, परमबीर सिंग आणि कर्नल श्रीवास्तव यांचा आग्रह होता. त्यांनी माझ्यावर RSS आणि VHP च्या वरिष्ठ सदस्यांचे, उत्तर प्रदेशचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव आणला. 3 नोव्हेंबर 2008 पर्यंत हा छळ सुरू होता. त्यांना केलेल्या छळामुळे माझा गुडघा तुटला, त्यामुळे मला आता चालताही येत नाही. आपल्याला गोळ्या घालण्याची योजना होती, असे अनेक गौप्यस्फोट मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Lt. Col. Purohit) यांनी त्यांचे वकील विरल बाबर यांच्यामार्फत विशेष एनआयए न्यायालयात लेखी निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी वास्तव मांडले आहे. मुंबई एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर अत्याचार करून उजवा गुडघा मोडला. एटीएस अधिकारी आपली बेकायदेशीरपणे चौकशी करत होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ सदस्यांचे, गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकत होते. ऑगस्ट २००८ मध्ये, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिना आधी, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभेला संबोधित करताना हे केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत, तर हिंदू दहशतवादीही आहेत, असे विधान केले होते. लेफ्टनंट कर्नल पुरोहित (Lt. Col. Purohit) म्हणाले, ‘हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेचच २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्दैवी घटना घडली, असेही कर्नल पुरोहित म्हणाले.

(हेही वाचा Giriraj Singh : भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा काँग्रेसचा डाव; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून काँग्रेसचा समाचार )

एटीएसने बेकायदेशीर कोठडीत ठेवले

पुरोहित (Lt. Col. Purohit) यांनी दावा केला की, 29 ऑक्टोबर 2008 रोजी आपल्याला अटक करण्यात आली होती, तरीही एटीएसने मला अटक झाल्याचे दाखवले नाही. ते म्हणाले की, मुंबईत अटक झाल्यानंतर लगेचच खंडाळा येथील एका निर्जन बंगल्यावर नेण्यात आले, तेथे तत्कालीन एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे आणि परम बीर सिंग (तत्कालीन एटीएसचे सहआयुक्त) यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित म्हणाले, ‘हेमंत करकरे आणि परम बीर सिंग मला वारंवार सिमी, आयएसआय आणि माझ्या गुप्तचर नेटवर्कची माहिती देण्यास भाग पाडत होते आणि मला डॉ. झाकीर नाईकच्या कामाविषयी माहिती देण्यास सांगितले. मी माझ्या नेटवर्कबद्दल माहिती देण्यास नकार दिला, असेही कर्नल पुरोहित (Lt. Col. Purohit) म्हणाले. पुरोहित यांच्या म्हणण्यानुसार, ‘एक आर्मी ऑफिसर, कर्नल पीके श्रीवास्तव, जे माझे वरिष्ठ होते आणि आता निवृत्त झाले आहेत, त्यांनी मला फसवून मला एटीएसच्या हवाली केले. पोलिस कोठडीत माझ्यावर हल्ला करणारा तो पहिलाच होता. यानंतर सहा हवालदारांनी मला बांधले आणि परमबीर सिंग यांनीही माझ्यावर हल्ला केला. कोणत्याही प्राण्यालाही दिली जाणार नाही अशी वागणूक मला दिली. मला शत्रू देशाच्या युद्धकैद्यापेक्षा वाईट वागणूक मिळाली, असे कर्नल पुरोहित म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.