Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

अब्रूनुसानीचा दावा दाखल करण्याचा भुसे, देसाई यांना सल्ला

148
Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलच्या अटकेनंतर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रकरणी आपल्यावर नाहक आरोप होत असून बदनामी केली जात असल्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा सल्ला दिला. तुम्ही खटला दाखल करा पुढे मी पाहतो, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची तयारी दर्शवली. (Lalit Patil Case)

कुख्यात ड्रग्ज तस्कर आणि पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील बडे नेते गुंतल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात पोलीस अधिकारी तसेच राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. अंधारे यांनी ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि ठाणे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Lalit Patil Case)

(हेही वाचा – Narayan Savarkar : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर)

ललित पाटील प्रकरणात विरोधी पक्षाकडून थेट नाव घेतले जात असल्याने दादा भुसे आणि शंभूराज देसाई अस्वस्थ आहेत. त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत आपली अस्वस्थता बोलून दाखवली. ललित पाटील प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही. तरीही विरोधक आमची नावं उघडपणे घेत आहेत. त्यामुळे सरकार म्हणून आरोप करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भुसे, देसाई यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईची तयारी दर्शवली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अशी कारवाई करता येत नसल्याचे सांगत आरोप करणाऱ्यांच्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊन अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, असा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Lalit Patil Case)

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाने ललित पाटील धडधाकट असताना तो गेली नऊ महिने पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्ण म्हणून कसा दाखल होता, याची चौकशी सुरू केली आहे. नऊ महिन्यात त्याला नेमका कोणता आजार आहे याची निदान होऊ शकले नाही. शिवाय ललित पाटील रूग्णालयात दाखल असताना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस तैनात होते. पोलीस बंदोबस्त असताना ललित पाटील रुग्णालयाच्या आत-बाहेर कसा करत होता? असे सवाल करत चौकशीत दोषी आढळणाऱ्या ससून रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय गृह विभागाकडून दोषी पोलिसांवर कारवाई अपेक्षित असल्याचे सूत्रांनी संगितले. (Lalit Patil Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.