Shivsena : …मग शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये उद्धव ठाकरेंनी कसे घेतले?; किरण पावसकर यांचा सवाल

347
मंगळवारी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेऊन जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्याच्या बहाण्याने विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात प्रचंड थयथयाट केला. पण आमची त्यांना विचारणा आहे की,तुम्हाला निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष, सुप्रीम कोर्ट आदि कोणत्याच संवैधानिक संस्थांचा निर्णय मान्य नाही. मग शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये तुम्ही कसे घेतले, असा सवाल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला.

महाराष्ट्रातील कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही

पावसकर यांनी ठाकरे यांच्या कालच्या कृतीबद्दल आपला संताप व्यक्त करताना म्हणाले की, ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी (Shivsena) जीवाचे रान केले, त्यांना तुडविण्याची भाषा उद्धव ठाकरे करत आहेत. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शिवसैनिक म्हणून ठाणे, कल्याण, पालघरमध्ये व उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेसाठी अहोरात्र काम केले, राज्यासहीत देशांत कोणताही नैसर्गिक आपत्ती येऊद्या त्या संकटात मदत घेऊन कसलीही पर्वा न करता धावून जाणारा एक कडव्या शिवसैनिकाला अडवा-तुडवा अशी भाषा उद्धव ठाकरे करत आहेत, हे महाराष्ट्रातील कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असूच शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी जनतेचा आणि शिवसैनिकांचा वापर करून त्यांची मने, त्यांच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम केले आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना कशी सांभाळली, कशी वाढवली याची उद्धव ठाकरे यांना काहीच कल्पना नाही, त्यांनी फक्त शिवसैनिकांना कामापुरते वापरले आणि नंतर फेकून दिल्याचा थेट आरोप करत पावसकर यांनी आपला संतापही व्यक्त केला.

तुमच्याकडे ढुंकून सुद्धा येणार नाहीत

पावसकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी काल प्रश्न केला की जर मी पक्षप्रमुख नसेन तर गृहमंत्री अमित शाह माझ्याशी महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीची चर्चा करण्यासाठी का आले? मुळात उद्धव ठाकरे यांचा हा प्रश्नच हास्यास्पद आहे. अमित शाह तुमच्याजवळ आले, कारण त्यावेळेस आमच्यासोबत असलेले ४० आमदार आणि तुमचे १६ आमदार तुमच्याजवळ होते आणि बाळासाहेबांना देखील देशाच्या राजकारणात मान आहे त्यांचा मान ठेऊन ते तुमच्याकडे आले होते. मात्र आज एवढे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत. आता ते तुमच्याकडे ढुंकून सुद्धा येणार नाहीत, असा इशाराही त्यांनी ठाकरे यांना दिला. ते पुढे म्हणाले की, ज्या हिंदुत्वाचा गवगवा उद्धव ठाकरे करताहेत त्याबद्दल बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही. कारण १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन याच्या कबरीच्या सुशोभीकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाले होते. मालाडच्या उद्यानात टिपू सुलतान मैदान नाव देण्याचा प्रस्ताव आणि मदरश्यांचे आधुनिकीकरण करून त्यातील मौलवींचे पगार वाढवण्याचे प्रस्ताव मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच दिले होते. पण दुसरीकडे तुम्ही मनपाच्या बंद पडणाऱ्या मराठी शाळा, अडीच ते तीन हजाराच्या तुटपूंज्या पगारावर काम करणारे ९२ मराठी शाळांमधील शिक्षक यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलात, याकडेही पावसकर यांनी लक्ष वेधले.

एखाद्या अरबाला शिवसेना विकून आले असते

ज्या काँग्रेसने राममंदिराला विरोध केला आज त्याच काँग्रेसच्या सोबत जाऊन तुम्ही बसलात, हेच तुमचे हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरे यांना शिवसेना (Shivsena) पक्ष आणि शिवसैनिकांशी काहीही घेणे देणे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर उठाव केला नसता, तर उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र परदेशी जाण्याच्या बहाण्याने तिथल्या एखाद्या अरबाला शिवसेना विकून आले असते आणि नंतर त्याने कागदपत्रांसह शिवसेना आपली आहे असे सांगून शिवसेनेवर हक्क सांगितलं असता. मात्र वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी जीवावर उदार होऊन केले आहे.त्यामुळे त्यांच्याबद्दल वावगे बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना काहीच अधिकार नाही, अशा कडक शब्दात ठाकरे यांना पावसकर यांनी समजही दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.