ठाकरे सरकारला वाटतेय अधिकाऱ्यांची भीती?

आता डोकेदुखी ठरत असलेल्या अधिकाऱ्यांची धास्ती तर सरकारने घेतली नाही ना, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

91

मागील वर्षभरात ठाकरे सरकार आणि अधिकाऱ्यांमधील वाद अनेकदा समोर आले आहेत. याच अधिकाऱ्यांमुळे ठाकरे सरकार अनेकदा अडचणीत देखील आले आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आणखी एक दावा केल्याने, ठाकरे सरकारलाच आता अधिकाऱ्यांची भीती वाटू लागली आहे. त्याचमुळे की काय आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता सरकारने काही तरी धोरण आखून अधिकाऱ्यांची चौकशी करायला हवी, असे सांगितले आहे. त्यामुळे आता डोकेदुखी ठरत असलेल्या अधिकाऱ्यांची धास्ती तर सरकारने घेतली नाही ना, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पांडेंनी का घेतली माघार? कोडे उलगडे ना

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास नकार देत, या प्रकरणात दुस-या तपास अधिका-यांची नेमणूक करण्यात यावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. पांडे यांनी या प्रकारणातून अचानक काढता पाय का घेतला, याचे कोडे अद्यापही सरकारला सुटलेले नाही. याबाबत हसन मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी, “पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचे का सांगितले मला कळत नाही, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावेल ही भीती आहे. असे अधिकारी मोकाट सुटलेले आहेत. यांनी ज्यावेळी 100 कोटींचा लेटरबॉम्ब टाकला, त्यावेळी सगळीकडे याचीच चर्चा होती. पण आता 1 हजार कोटींपेक्षा जास्त वसुलीचा परमबीर यांच्यावर आरोप असूनही, सर्व शांत का?, असा सवाल मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच रश्मी शुक्ला या पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या गटात गेलेल्या अधिकारी आहेत. त्या फोन टॅपिंग करत होत्या. तसेच आमचे आमदार यड्रावकर यांना काही अधिका-यांनी 20 कोटींची ऑफर दिली होती. त्यामुळे सरकारने आता या सर्व प्रकरणी धोरण आखून चौकशी करावी, असे देखील मुश्रीफ म्हणाले.

(हेही वाचाः ठाकरे सरकारची अधिका-यांनी उडवली झोप! कॅबिनेटमध्येही गाजला मुद्दा)

‘त्या’ अधिकाऱ्यांचीही सरकारला वाटते भीती

फडणवीस सरकारच्या काळातील मंत्र्यांकडे असलेला कर्मचारी वर्ग, आजही महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांकडे कार्यरत आहे. त्यामुळे आता हा कर्मचारी वर्ग बदलायचा की तोच कायम ठेवायचा, असा विचार देखील महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांचे असे म्हणणे आहे की, हा कर्मचारी वर्ग दूर करण्यातच महाविकास आघाडीचे भले आहे. एवढेच नाही तर संघाशी जवळीक असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील आता ठाकरे सरकार विशेष लक्ष ठेवून आहे. महत्त्वाच्या बैठकांपासून फडणवीसांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना लांबच ठेवले जात असल्याची चर्चा देखील, काही दिवसांपासून सुरू आहे.

या अधिकाऱ्यांमुळे ठाकरे सरकार अडचणीत

आतापर्यंत ठाकरे सरकार सचिन वाझे, परमबीर सिंग, रश्मी शुल्का, अमिताभ गुप्ता यांसारख्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमुळे अडचणीत आले आहे. त्यातच परमबीर सिंग यांच्यामुळे तर ठाकरे सरकारमध्ये गृहखात्याचे मंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले. तर सचिन वाझे यांच्यामुळे ठाकरे सरकारची पुरती नाचक्की झाली. एवढेच नाही तर सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे तर मातोश्रीच्या जवळ असलेले, परिवहन मंत्री अनिल परब थेट अचडणीत आले आहेत.

(हेही वाचाः दोन ‘अनिल’ रडारवर, ठाकरे सरकार ‘गॅस’वर!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.