Cabinet expansion : १२ जुलैला मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार? हालचालींना वेग

163
Cabinet expansion : १२ जुलैला मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार? हालचालींना वेग

अजित पवार गटाला सत्तेत सामावून घेतल्यामुळे शिवसेना-भाजपातील आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. ती दूर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होत असताना, आमदारांमधील रुसवे-फुगवे दूर करण्यासाठी येत्या बुधवारी १२ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून मुंबईत सुरू होत आहे. तरीही ९ मंत्री (राष्ट्रवादीच्या कोट्यातील) अद्याप बिनखात्याचे आहेत. आम्हाला सत्तेचा पुढचा वाटा मिळाल्याशिवाय खातेवाटप करू नका, अशी शिवसेनेच्या आमदारांची आग्रही मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. नव्या मंत्र्यांना अधिवेशनाची तयारी करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मिळावा, यासाठी १२ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे कळते.

(हेही वाचा – Union Cabinet : महाराष्ट्रातून पटेल, शेवाळे, उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्यता)

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये सध्या १४ मंत्रीपदे शिल्लक आहेत. त्यामुळे भाजपा ६, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी ४ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. हा विस्तार झाल्यानंतरच खातेवाटप होणार असून, अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्याने संपूर्ण मंत्रिमंडळाची रचना (खातेवाटप) नव्याने केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कुणाला मिळणार संधी?

– लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व समाजघटकांना सत्तेत प्राधान्य दिले जाणार आहे. भाजपामधून संजय कुटे, माधुरी मिसाळ, राम शिंदे, प्रवीण दरेकर, किसन कथोरे, विजय देशमुख, जयकुमार रावल आदींची नावे चर्चेत आहेत.
– शिवसेनेतून बच्चू कडू, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि एका महिला आमदाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातून मकरंद पाटील (वाई), दत्ता भरणे (इंदापूर), दिलीप मोहिते (खेड-आळंदी), तसेच मराठवाड्यातून सतीश चव्हाण किंवा प्रकाश सोळंके ही नावे चर्चेत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.