Heavy Rain : हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

180
Heavy Rain : हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

यावर्षी देशात मान्सून (Heavy Rain) उशिराने दाखल झाला असून त्याने आता रौद्र रूप धारण केले आहे. देशातील अनेक ठिकाणी भूस्खलन, दरड कोसळणे, पूर यासारख्या घटना घडत आहेत. या मुसळधार पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. संततधार पावसामुळे देशातील विविध भागांत आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाचा अंदाज घेता येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशातच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जुलैच्या पहिल्याच आठ दिवसांत झालेल्या पावसाने देशभरातील पावसाची कमतरता भरून काढली, असे हवामान खात्याने रविवारी (9 जुलै) सांगितले. आतापर्यंत एकूण 243.2 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक आहे. राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.

(हेही वाचा – West Bengal violence : पुन्हा ६९७ बूथवर होणार मतदान)

दिल्लीत शाळेला सुट्टी जाहीर

सलग दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, दिल्लीत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन आज दिल्लीतील सर्व शाळा एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

हिमाचलमध्ये अतिवृष्टीमुळे पाच जणांचा मृत्यू

शिमला जिल्ह्यातील कोठगढ भागात भूस्खलनामुळे एक घर कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. कुल्लू शहरातही भूस्खलनामुळे एका तात्पुरत्या घराचे नुकसान झाले असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दुसर्‍या अपघातात, चंबा तहसीलमधील कटियान येथे शनिवारी रात्री भूस्खलनाच्या खाली एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

उत्तराखंडमध्ये आठ जणांचा मृत्यू

उत्तराखंडची परिस्थिती सुद्धा सारखीच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सरासरीपेक्षा 2.5 ते 3 पट जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या भागात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सरकारने लोकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. 11-12 जुलैसाठी, कुमाऊं आणि त्याच्या लगतच्या गढवाल, चमोली भागात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसात भूस्खलनामुळे वाहनांचे अपघात आणि घरांची पडझड होऊन आठ जण ठार झाले, तर सहा जण जखमी झाले अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिली. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत लोकांना अनावश्यक हालचाली टाळण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने जनजीवन विस्कळीत होत असून चार धाम यात्रेलाही अडथळा निर्माण होत आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.