Eknath Khadse : आपण भाजपामध्ये प्रवेश करणार; पण…; एकनाथ खंडसेंनी प्रवेशासंबंधी केले खुलासे

माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

197
एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, याबाबत आता स्वतः खडसे यांनीच खुलासा केला आहे. आपण भाजपामध्ये प्रवेश करणार आहे, मात्र गुढी पाडव्याला नव्हे तर 15 दिवसांनंतर करणार आहे, हा प्रवेश करण्यासाठी आपण कोणत्याही अटी शर्थी ठेवल्या नाहीत, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse)  म्हणाले.

पक्षातील जुने नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा 

माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. माझी भाजपामधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपामध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली  आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजपा प्रवेश होईल, अशी माहिती खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे.

पक्षप्रवेश नवी दिल्ली येथे होणार 

भाजपा प्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांना या निर्णयामागील कारणे सांगितली. त्यांची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतरच मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांत विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र खडसे यांना याबाबत खुलासा करत माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात नव्हे तर नवी दिल्ली येथे होईल, असं सांगितलं आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून जेव्हा वेळ दिली जाईल, त्यानंतर मी दिल्लीत जाऊन भाजपा प्रवेश करेन, असं ते म्हणाले. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मी कोणत्याही अटी-शर्थी ठेवल्या नसून आधी माझी जी नाराजी होती, ती दूर झाली असल्याचं एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) सांगितलं आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.