-
प्रतिनिधी
Shiv Sena UBT शिवसेना उबाठामध्ये सध्या पडद्यामागे मोठी राजकीय उलथापालथ सुरू असून, आता ‘आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत’ असा अंतर्गत सामना रंगल्याचा खळबळजनक दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षाची धुरा नेमकी कोणाकडे राहणार, यावरून पक्षात दोन गट पडले असून संजय राऊत स्वतः पक्षप्रमुख होण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचा घणाघात भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. (Shiv Sena UBT)
पक्षाच्या चाव्या कुणाकडे? राऊतांची रणनीती
मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू असताना, “मला याबाबत काहीच माहित नाही,” असे राऊत म्हणत आहेत. जर हे निर्णय पक्षात होत असतील, तर राऊत स्वतःला पक्षाबाहेर मानतात का, असा खोचक सवाल बन यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंनंतर शिवसेना उबाठावर आपले नियंत्रण राहावे, यासाठी राऊत एका विशिष्ट गटाला सोबत घेऊन आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाला विरोध करत असल्याचा दावा त्यांनी केला. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – दोन वेळचा ऑलिम्पिक आणि विश्वविजेता Victor Axelsen बॅडमिंटनमधून निवृत्त)
दिल्लीतून ‘वावड्या’ आणि खासदारकीचे गणित
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात फिरत नाहीत, ते केवळ घरी बसतात, अशा चर्चा राऊत गटातील काही खासदारांमार्फत दिल्लीत पसरवल्या जात असल्याचा आरोप बन यांनी केला आहे. या अंतर्गत वादामागे खासदारकीचे गणित दडलेले आहे. येत्या दीड वर्षात संजय राऊत यांच्या खासदारकीची मुदत संपत आहे. जर त्यावेळेस आदित्य ठाकरे कार्याध्यक्षपदी असतील, तर राऊत यांना पुन्हा खासदारकी किंवा मुख्य प्रवक्तेपद मिळण्याची शक्यता धूसर आहे. आपला पत्ता कट होईल या भीतीनेच राऊत यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात मोहीम उघडल्याचे चित्र दिसत आहे. (Shiv Sena UBT)
फाळणी महाराष्ट्राची नव्हे, तुमच्या पक्षाची झाली!
मतदारसंघ पुनर्रचनेवरून टीका करणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांनी खडे बोल सुनावले. “देशात आग लागणार नाही, तर जागा वाढल्यामुळे विरोधकांच्या पोटात आग लागली आहे,” असे ते म्हणाले. विधानसभेत ४०० आमदार कुठे बसणार, असा प्रश्न विचारणाऱ्या राऊतांना त्यांनी सुनावले की, लोकसभेत साडेपाचशे खासदार बसू शकतात तर महाराष्ट्रात ४०० आमदार का बसू शकत नाहीत? महाराष्ट्राच्या फाळणीच्या गप्पा मारण्यापेक्षा राऊतांनी स्वतःच्या पक्षाच्या झालेल्या तुकड्यांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्र एकसंध आहे आणि राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेना उबाठातील या अंतर्गत संघर्षावर बोट ठेवले आहे. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

