पुढील तीन महिन्यांत धारावीच्या पुनर्विकासाला सुरुवात करणार; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

127

धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांत धारावीच्या पुनर्विकासास सुरुवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मंजुरी आणि निविदांची कामे लवकरच मार्गी लागतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

( हेही वाचा : मंत्र्यांची दिशाभूल करून परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला दणका)

वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्वेक्शन सेंटरमध्ये नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो २०२२ चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मुंबईतील वाहतुकीसंदर्भातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे जात असून, मुंबईच्या विकासाकरिता विकासकांच्या नवनवीन कल्पनांची आवश्यकता भासणार आहे. वित्तीय संस्था शासनाबरोबर काम करायला उत्सुक आहेत. यामुळे याचा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे. आपल्याला मुंबई ही राहण्याजोगी करण्याबरोबरच मुंबईतील लोकांच्या राहणीमानाचा दर्जाही वाढवायचा आहे. महारेरा कायदा आला आणि तो यशस्वी झाला. महारेराने उद्योगांसाठी विश्वासार्हता आणली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नैना : तिसरी मुंबई म्हणून ओळख

मुंबईतील म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. मुंबई हे आय-लॅण्ड शहर असून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, यासाठी मेट्रो, ट्रॉन्सहार्बर लिंक, कोस्टल रोड यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ते पुढील वर्षाच्या शेवटी पूर्णत्वाकडे जाणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळाजवळ नैना हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नैनाची तिसरी मुंबई म्हणून ओळख असणार आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विकासक, गुंतवणुकदारांना शासनाकडून काही सवलती देण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय घेऊ, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.