अनधिकृत बांधकामांची गय करू नका, बिनधास्त तोडा! मुख्यमंत्र्यांचा आदेश

कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नये. आम्ही आपल्या पाठीशी आहोत.

120

अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महापालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता मागील २५ वर्षांपासून असून आजवर प्रशासनाला सहकार्य करुन त्यांना अनधिकृत बांधकाम तोडता आले नाही. मात्र, आता तरी प्रशासनातील अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या टॉनिक नंतर धडक कारवाईची मोहीम राबवतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फररन्सीद्वारे महापलिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्य-कठोरपणे यावर तातडीने कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नये. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा, कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळायला नको, असेही ते म्हणाले.

(हेही वाचाः महापालिका चिटणीस पदाला वादाची किनार)

वेळेत कामे पूर्ण करा

आपल्याला शहर सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील याकडे बारकाईने लक्ष द्या आणि काम पूर्ण करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या, असेही मुख्यमंत्री या बैठकीदरम्यान म्हणाले.

महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे निर्देश

आयोजित बैठकीच्या अखेरीस महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच बैठकी दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी निर्देशित केल्यानुसार मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू करावी. त्याचबरोबर रस्ते, पदपथ इत्यादींबाबत देखील आवश्यक ती कामे प्राधान्याने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने करावीत. याबाबतचा नियमित अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

(हेही वाचाः खाडी लगतच्या बांधकामांना ‘अभय’…निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा ‘हा’ निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.