विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब- मुख्यमंत्री

103

शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पूर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे. आता सगळ्याच क्षेत्रांत, आघाड्यांवर विकास कामांचा धडाका सुरू आहे. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्वच क्षेत्रांतील कामांनी गती घेतली आहे. विकास कामे, योजना, प्रकल्पांमध्ये सामान्यांच्या आशा- आकांक्षा यांचं प्रतिबिंब उमटेल, यावर भर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. विकास कामांना गती आली आहे. थांबलेलं चक्र पुन्हा वेगानं फिरू लागलं आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलाय. परिस्थिती बदलत आहे. महाराष्ट्राकडे सगळेच आशेनं आणि विश्वासानं पाहू लागले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ झटकली जात असल्याने सकारात्मक बदल आपल्याला पहायला मिळत आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः सरकारमधील नाराज आमदार माझ्या संपर्कात, मी धमाका करणार! बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे पाऊल टाकत असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित, शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करत आहोत. नैसर्गिक आपत्ती आली त्याने आपण डगमगलो नाही. त्यामुळं काही चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आणि त्या यशस्वी होत आहेत याचं समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना दुप्पट भरपाई

दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ केवळ १०० रुपयांत दिला, त्याचा ७ कोटी लोकांना लाभ होत असून अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदतीच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. त्यामध्ये जवळपास ३० लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ७५५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांना ९५० कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाचे लवकरच उद्घाटन

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येत आहे. मुंबईतल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास परवानगी दिलेली आहे. मुंबई, नागपूर, पुणे मेट्रोची कामे वेगाने सुरु आहे. मुंबईत ३३७ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल लोकांना मोठा दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र काम करणार

– कृषी सिंचन पायाभूत सुविधा उद्योग पर्यटन आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना आम्ही गती देतोय. यामध्ये सर्व सामान्यांच्या अशा आकांक्षा यांचा प्रतिबिंब उमटेल यावर आमचा भर आहे.
– विदेशी गुंतवणूक आणि व्यापार – उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकासात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल ही आमची मनोकामना आहे.
– यासाठी आम्ही सर्वांनी एकजूट केली आहे. त्याला आपण साथ देत आहातच. ही साथ कायम राहील. हे नातं घट्ट आणि बळकट होईल.
– जनतेच्या मनातील प्रश्न, अडीअडचणी आणि भावना समजून घेऊन पुढे जाणारं आमचं सरकार असून त्यासाठी अहोरात्र काम करण्याची, जनतेत जाऊन, त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.