अर्थसंकल्पीय अधिवेशन: विरोधक विधान भवनाच्या पाय-यांवर आक्रमक, कांद्यांसह कापसाला हमीभाव देण्याची मागणी

108

नाशिकसह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असून मंगळवारी विधानभवनातदेखील याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पाय-यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतक-यांसह आता आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटला आहे. अनेक भागात शेतक-यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. शिवाय नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून, लासलगावी कांदा लिलाव बंद पाडण्यात आले. कांद्याच्या भावात सततची घसरण होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच हा मुद्दा आता विधानभवनात देखील गाजत असून राष्ट्रवादी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर उतरत जोरदार आंदोलन केले.

( हेही वाचा: शिंदे गटात जाण्यासाठी भास्कर जाधव यांनी 100 फोन केले; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट )

विरोधकांच्या सत्ताधा-यांविरोधात घोषणा

यावेळी सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उद्ध्वस्त.. शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. कापसाला भाव मिळालाच पाहिजे,अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतक-यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अधिवेशनाच्या दुस-या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.