Kasba Bypoll Election Result 2023: पराभवानंतर भाजपच्या हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,..

91

तब्बल तीन दशके भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असलेला कसबा पेठ काँग्रेसने आपल्याकडे हिसकावून घेतला आहे. कारण अत्यंत चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला त्यात काँग्रेसच्या (मविआ) रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मतांनी प्रतिस्पर्धी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून धंगेकर यांनी काही प्रभाग वगळता सर्वच ठिकाणी आघाडी कायम ठेवली होती. विजयाचा गुलाल त्यांच्यावरच उधळणार, असाच आत्मविश्वास धंगेकर यांच्यात सकाळपासूनच दिसत होता आणि अखेर त्यांनी विजय प्राप्त केला. भाजपने हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी विविध प्रकारे रणनीती आखली होती. मात्र यंदा मतदारांनी भाजपला दणका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान पराभवानंतर भाजपचे हेमंत रासने यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मी उमेदवार म्हणून कमी पडलो – हेमंत रासने

‘मी उमेदवार म्हणून कमी पडलो. हा निकाल मला मान्य आहे,’ अशी प्रतिक्रिया कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. कसब्यात मागील काही दिवसांपासून हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर सुरू होती. ती काटे की टक्कर शेवटपर्यंत पाहायला मिळाली. मतमोजणी सुरू झाल्यापासून रवींद्र धंगेकर आघाडीवर होते आणि हेमंत रासने पिछाडीवर होते. सातव्या फेरीत फक्त हेमंत रासने आघाडीवर दिसले होते. मात्र त्यानंतरच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर गेले.

२००२, २०१२, २०१७ मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून तर, २०१९-२० ते २०२१-२२ सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले हेमंत रासने यांच्यावर भाजपने कसब्याचा गड राखण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र मविआच्या रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला.

(हेही वाचा – Kasba Bypoll Election Result 2023: भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचा विजय; रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.