हेमंत रासनेंसमोर कसबा भाजपचा बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान

109

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशात ही जागा राखण्याचे मोठे आव्हान रासने यांच्यासमोर असणार आहे. कारण त्यांच्यासमोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे. २००२, २०१२, २०१७ मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून तर, २०१९-२० ते २०२१-२२ सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले हेमंत रासने यांच्यावर भाजपने कसब्याचा गड राखण्याची जबाबदारी सोपवली आहे.

गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या रासने यांना कसब्यातून उमेदवारी देताना भाजपने लोकांतील कार्यकर्ता हाच निकष ठेऊन उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, कसबा विधानसभा मतदारसंघातील तगडा जनसंपर्क हाच मुख्य निकष ग्राह्य धरत काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांनी याआधी २००९ आणि २०१४ मध्ये मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या गिरीश बापट यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत धंगेकर यांना ४६ हजार ८२० इतकी मते मिळाली होती. तर गिरीश बापट यांचा ५४ हजार ९८२ इतकी मते मिळून विजय झाला होता. तर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत कसब्यातून धंगेकर यांना २५ हजार ९९८ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे गिरीश बापट यांना कडवी झुंज देणारे रवींद्र धंगेकर यांची पुण्यात ‘जायंट किलर’ अशी ओळख बनली होती.

(हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये नवा ट्वीस्ट; दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या भावाने भरला उमेदवारी अर्ज)

आता गिरीश बापट यांनी २५ वर्षे कसब्याचे प्रतिनिधित्व केले आणि मुक्ता टिळक यांनी २०१९ पासून कसब्याची धुरा सांभाळली होती. त्यामुळे कसबा भाजपचा बालेकिल्ला मनाला जातो. अशात काँग्रेसकडे गमवण्यासारखे काहीच नाहीये. तर भाजपने मात्र, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.