फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी पहाटे नाही तर ‘या’वेळेत झाला; भगतसिंह कोश्यारींनी स्पष्टच सांगितलं…

155

२०१९ साली अजित पवारांसोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पूर्ण कल्पना होती, किंबहुना त्यांच्या संमतीनंच सगळं झालं होतं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर आता पहाटेच्या शपथविधीबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलले आहेत. एका खासगी मराठी वृत्तसंकेतस्थळासोबत बोलताना त्यांनी हा शपथविधी रात्री किंवा पहाटे नाहीतर सकाळी आठ वाजता झाल्याचं सांगितलं आहे.

राज्यपाल पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हणाले?

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ‘राजकारणात जेव्हा मी राहणार नाही. अनेक लोकं राहणार नाहीत. आणि जो खरा राजकारणी आहे, जो अभ्यासक आणि विचारवंत आहे. तो विचार करेल की, एका रात्रीत हे सर्व कसं घडलं? कधी कधी तर अशा गोष्टी एका क्षणात होतात. तुम्ही तर एका रात्रीचचं बोलत आहात. जेव्हा भूकंप येतो, तेव्हा एका क्षणात घडून जातं. एका रात्रीत घडलं हे कोणी सांगितलं? हे तर स्वाभाविक आहे, जेव्हा आमच्याकडे एक मोठा नेता येतो आणि त्याच्यासोबत मित्रपक्ष येतो, आणि सांगतो की, या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. तो विश्वसनीय नेता आहे. असं नाही, छोटा-मोठा नेता आहे. अजित पवारांना छोटा-मोठा नेता मानता येणार नाही. ते आमच्याकडे आले. मी म्हणालो ठीक आहे. तुमचं बहुमत सिद्ध करा. मी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला. हा वेळ जास्त दिला असं ही होऊ शकतं. त्यानंतर न्यायालयानं वेळ कमी करण्यास सांगितलं आणि मी वेळ कमी केला. मग बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे समर्थ नव्हतं, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ही सामान्य गोष्ट आहे.’

लोकांना बोलवण्याचं काम राज्यपाल करत नाही

तसंच पुढे शपथविधीला माध्यमांना किंवा इतर नेत्यांना आमंत्रण का दिलं नाही याबाबत विचारलं असता कोश्यारी म्हणाले की, ‘राज्यपाल लोकांना बोलवतं नाही. सगळ्यांना बोलवण्याचं काम सर्वकाही राज्यपाल करत नाही. हे काम सरकार करतं. तसंच जे शपथ घेतात ते माध्यमांना आणि इतर लोकांना बोलावण्याचं काम करतात. जो काही शपथविधीचा सोहळा झाला, त्या सगळ्यात मी ज्यांना शपथ दिली त्या देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात भाष्य अगोदच केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर मी यामध्ये कुठे येतो.’

(हेही वाचा – १२ आमदारांच्या नियुक्ती पत्रावर ‘यामुळे’ मी सही केली नाही; भगतसिंह कोश्यारींचा गौप्यस्फोट)

‘या’बद्दल शरद पवारांनी विचार करावा 

या शपथविधीबाबत शरद पवारांना माहित होतं, राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी त्यांनी ही खेळी रचली. याबाबत कोश्यारी म्हणाले की, ‘जर आणि तर वर शरद पवारांसारखे इतके मोठे व्यक्ती चालत असतील, तर मी म्हणेन की, त्यांनी न्यायालयात असलेल्या लवासाच्या प्रकरणावर दहा वेळा विचार करायला हवा. न्यायालयानं त्यांच्याबाबत काय म्हटलं आहे त्याबद्दल. ते इतके मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्या मी इतका सन्मान करतो. मी त्यांना दोन-दोन वेळा माझ्या हस्ते डी. लीट दिली. मी त्यांचा आदर करतो. जर ते असं म्हणतं असतील, तर ते राजकीयदृष्ट्या बोलत असतील.’

‘माझ्याजवळ असं कोणताच दबाव नव्हता. जर कोणता नेता बहुमत सिद्ध करायला वेळ मागतो. तर मी तो वेळ दिला. पण काही लोकं न्यायालयात गेले. मग न्यायालयानं सांगितलं, लवकर करा, मी लवकर केलं. मी यामधे कुठे येतो. सगळं माध्यम रात्री शपथविधी झाली, म्हणतंय. सकाळी आठ वाजता शपथविधी झाली. तरीही संपूर्ण जगभरात रात्री शपथविधी झाला पसरलंय,’ असं स्पष्टच कोश्यारींनी सांगितलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.