वांद्र्यात देहविक्री करणाऱ्या तृतीयपंथीयांकडून एका व्यक्तीला मारहाण करून लूट; व्हिडीओ व्हायरल

119
धारावी टी जंक्शनपासून काही अंतरावर असलेल्या कांदळवनात देहविक्री करणाऱ्या तृतीयपंथीयांनी एका पादचाऱ्याला भररस्त्यात मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. परंतू या मारहाणीची तक्रार देण्यासाठी अद्याप कुणीही पुढे आलेले नसल्यामुळे पोलीस ठाण्यात अद्याप या घटनेची रीतसर नोंद झालेली नाही. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी नियमित होत असतात. तोकडे कपडे घालून हे तृतीयपंथी रस्त्यावर अश्लील प्रकार करीत असल्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना शरमेने मान खाली घालावी लागत असल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिक देत आहे.
मुंबईतील धारावी टी जंक्शन येथून वांद्र्याच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला फुटपाथवर आणि मागे असलेल्या कांदळवनात तृतीयपंथीय मोठ्या प्रमाणात देहविक्री करतात. काळोख होताच हे तृतीयपंथी तोकड्या कपड्यांत रस्त्यावर येतात व येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना आकर्षित करण्यासाठी अश्लील इशारे करताना दिसतात. त्यांच्या या कृत्यामुळे अनेकांना शरमेने मान खाली घालून जावे लागते. महिलांना तर रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर जाणे म्हणजे अतिशय धोकादायक आहे, असे येथील स्थानिक नागरिक सांगतात.

तृतीयपंथी केवळ देहविक्री न करता त्यांच्याकडे जाणाऱ्या ग्राहकांना किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीची लूटमार करीत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. असाच काहीसा प्रकार रविवारी घडल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे. या ठिकाणी काही तृतीयपंथी एका व्यक्तीला मारहाण करीत आहे व त्यांच्यासोबत असणारे दोन पुरुष या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल पर्स काढत असल्याचे व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. तसेच, या व्यक्तीच्या मदतीसाठी येणाऱ्यांना हे तृतीयपंथी धमकी देत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हिंदुस्थान पोस्टच्या हाती हा व्हिडीओ लागला आहे.
या व्हायरल व्हिडीओप्रकरणी धारावी पोलीसांनी काय कारवाई केली? याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ रविवारी रात्री उशिरा पोलिसांच्या हाती लागल्या  त्यानंतर गस्तीवरील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, त्या ठिकाणी कोणीही आढळले नाही. या ठिकाणी दररोज आमची गस्त वाहन उभे असते. रविवारी शिवजयंती असल्यामुळे गस्त वाहन व पोलीस मिरवणूक बंदोबस्तासाठी होते त्यावेळी ही घटना घडली असावी. मात्र अद्याप या प्रकरणी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात कोणीही आलेले नाही. परंतु आम्ही व्हिडिओतील घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई सुरू केली असून व्हिडीओमधील तृतीयपंथी आणि त्यांचे पुरुष साथीदार यांचा कसून शोध घेत आहोत, असे  कांदळगावकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. तसेच ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला त्याने पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहनदेखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांदळगावकर यांनी केले आहे.

हिंदुस्थान पोस्टचे स्टिंग ऑपरेशन…..

धारावी टी जंक्शनपासून काही अंतरावर असलेल्या कांदळवनात तसेच रस्त्यावर तृतीयपंथी देहविक्रीसाठी अश्लील इशारे करून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना खुणावत असतात व लूटमार करीत असल्याची माहिती जेव्हा ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधींना कळली त्यावेळी  स्वतः पोस्टच्या  प्रतिनिधीने मागील वर्षी स्टिंग ऑपरेशन केले होते. तसेच, या संदर्भात बातमीदेखील प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काही दिवस येथील तृतीयपंथीयांचा देहविक्री व्यवसाय बंद झाला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.