अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत

शिवसेनेकडून मनःपूर्वक स्वागत, शंकाकुशंका उद्भवण्याची गरज नाही.

142
अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल - उद्योग मंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना सोबत घेऊन परिपक्व राजकारण करणारे नेते आहेत. महाविकास आघाडीतून अजित पवार यांनी बाहेर येऊन महायुतीत प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल, शिवसेनेकडून त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत आहोत. याबाबत कोणत्याही शंकाकुशंका निर्माण करण्याची गरज नाही, असा स्पष्ट निर्वाळा बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला. आम्हा सर्वांसोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सांघिक आहे. शिवसेना व भाजपने एकत्र येऊन घेतलेला निर्णय आहे. शिवसेना भाजपने एकत्र येऊन महायुती वाढवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. या निर्णयामुळे कोणीही दुखावलेले नाही. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहायला हवेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे. आम्ही शिवसेना पक्षातर्फे त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत आहोत. आमच्यावर गद्दार, खोके अशी सकाळी उठल्यापासून टीका करणाऱ्यांना आजच्या शपथविधीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार महायुतीत आल्यानें अनेकांची तोंडे बंद झाली, असा टोला त्यांनी लगावला.

(हेही वाचा – Jayant Patil : नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली – जयंत पाटील)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील लोकांमध्ये प्रत्यक्ष काम करणारे नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा सरकारला व राज्याला लाभ मिळेल, असे ते म्हणाले. हे तिघे नेते एकत्र आल्याने महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही.
२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार.

आगामी विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार, असे सामंत म्हणाले. नेहमी नकारात्मक बाबी करणाऱ्यांनी या शपथविधीनंतर आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कालच्या उबाठाच्या मोर्चात सर्व भाषणे मुख्यमंत्री व सरकारवर टीका करणारी होती. आजच्या शपथविधीने त्याला चपराक मिळाली आहे. महाविकास आघाडीत आलबेल नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो, त्याची प्रचिती आली, असे सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे एखादे मंत्रिपद कमी झाले तरी देशाचे नेतृत्व मजबूत करणे अधिक महत्त्व आहे. उरलेली मंत्रीपदे लवकरच दिली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील विधानसभा व लोकसभा निवडणूक शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस एकत्रपणे लढतील, तिकीट वाटपावरुवन कोणताही वाद होणार नाही, असा निर्वाळा सामंत यांनी दिला.

लोकसभेत राज्यातील ४५ जागांवर विजयी होण्यासाठी तीन्ही नेते कार्यरत राहतील. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, घड्याळ चिन्ह कुणाचे, याचा निर्णय अजित पवार व त्यांचे सहकारी घेतील. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील या शपथविधीला हजर होते, त्यामुळे हा राष्ट्रवादीचा सर्वसमावेशक निर्णय असावा, असे सामंत म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.