सीमाभागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करा! अजित दादांचे मोदींना पत्र

सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत, असेही अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

140

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून, कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून, तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

काय आहे दादांच्या पत्रात?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६०हून अधिक वर्षे झाली आहेत. तरीही बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत, असेही पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे. सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्यावतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली आहे. हा प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत, असेही अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

WhatsApp Image 2021 08 11 at 12.41.27 PM

(हेही वाचाः भाजपच्या पाटलांपेक्षा ‘हे’ पाटील शहांच्या जवळचे?)

पंतप्रधानांनी न्याय द्यावा

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंती अजित पवार यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियांचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे, तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः अस्लम शेख यांच्या खात्यात सामंतांची वाझेगिरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.