रानपक्ष्याला लहान मुलांनी दिले जीवदान!

52

जाळ्यात अडकलेल्या रानपक्ष्याला मुलांनी जीवदान दिल्याची घटना दापोली तालुक्यातील कोंगाळे येथे घडली आहे. मुलांच्या या कृत्याचे कौतुक केले जात आहे.

( हेही वाचा : वाढदिवसाला सापाची ‘मिठी’, स्वंयघोषित सर्पमित्राला मिळाली कायद्याची ‘काठी’ )

रानातील पशुपक्ष्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात पशुपक्ष्यांचे योगदान किती महत्वाचे आहे, हे आजच्या पिढीला कळून चुकले आहे. पूर्वी दगड आणि बेचकी घेऊन पक्ष्यांना टिपण्यासाठी त्यांच्या मागे धावणारी, पाठलाग करणारी मुले आज अशा पक्ष्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावतात, तेव्हा त्यांचे कौतुक करावे तितके कमीच असते. दाणागोटा आणि भक्ष्य शोधताना असाच एक पाणकावळा अनवधानाने शेतीसंरक्षक जाळ्यात अडकला आणि जिवाच्या आकांताने जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा फडफडाट तेथे जवळच क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या मुलांच्या कानांवर पडला. या मुलांनी पुढे सरसावत त्या रानपक्ष्याला जीवदान दिले.

रानपक्ष्याला जीवदान दिले

दापोली तालुक्यातील कोंगळे या आंजर्ले खाडीपट्ट्यातल्या गावातील मुलांनी रानपक्ष्याला जीवदान दिले आहे. कोंगळे गावात राहणारी मुले खाडीजवळील शेतात क्रिकेट खेळत होती. परीक्षा संपल्याने ही मुले दररोज येथील हिरव्यागार खलाटीत क्रिकेट खेळतात. जवळच भाजीपाला शेतीच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात एक रानपक्षी अडकून जीव वाचविण्यासाठी फडफडाट आणि कलकलाट करताना या मुलांनी पाहिले. या रानपक्ष्याला वाचविण्यासाठी खेळ अर्ध्यावर सोडून ही मुले धावत त्या पक्ष्याकडे गेली. या रानपक्ष्याला वाचवायलाच, हवे असे मनाशी पक्के ठरवून या मुलांनी अथक प्रयत्न केले आणि त्याला वाचविले. जाळ्यात अडकलेले त्याचे पाय व पंख अलगद सोडवून या मुलांनी त्या पक्ष्याला जीवदान दिले आणि पाणी पाजून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

सध्या अनेक रानपक्ष्यांच्या प्रजाती दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्या आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याच्या कार्यात पक्ष्यांचे योगदान फार मोठे आहे. पाणकावळा ही एक अशीच दुर्मिळ होत चाललेली पक्षी प्रजाती आहे. छोट्या मुलांनी या पक्ष्यांचे पर्यावरणासाठीचे महत्त्व ओळखून संकटात सापडलेल्या रानपक्ष्याला जीवदान दिल्याने अनेक पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी आणि पक्षिप्रेमींनी छोट्या मुलांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.