राज्यात रंगणार ‘द्राक्ष’ महोत्सव! अशी करा नोंदणी…

95

शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत जुन्नर शहरात 19 ते 21 फेब्रुवारी 2022 हे तीन दिवस द्राक्ष महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून विविध सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. द्राक्ष महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. वर्षागणिक या महोत्सवाची लोकप्रियता वाढत असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक महोत्सवाला भेट देतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव होत असल्यामुळे याद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कला कुसर करणारे कारागीर, बचत गट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.

( हेही वाचा : यंदा तुम्हीही सिनेमाला मिळवून देऊ शकता ‘ऑस्कर’ )

पर्यटकांना सुवर्णसंधी

या महोत्सवाचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल. या महोत्सवात विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. या महोत्सवात पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्यात येईल. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था केली जाईल, जेथे पर्यटक आपल्या मित्र परिवारासोबत मजेशीर खेळ खेळून चांगला वेळ घालवू शकतील. 20 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या प्रसिद्ध शिवनेरी किल्ल्याची सफर आयोजित केली जाणार आहे. जुन्नरमधील देवराईमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येईल. त्यानंतर कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेट दिली जाईल. शेवटच्या दिवशी म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गीब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी समुह, ताम्हाणे संग्रहालय, लेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल. तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील लोक पदार्थ-वस्तू पाहता आणि खरेदी करता येतील.

( हेही वाचा : महाराष्ट्र पुरवणार ‘वाघ’! )

येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे, कारण ते इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे वाईन कशी बनते याची प्रक्रिया डोळ्यादेखत पाहून, पर्यटक वाईन खरेदीही करू शकतात. पर्यटक ब्लॅक करंट, मनुके आणि द्राक्षांचा ताजा रस यांचा मधुर आस्वाद घेऊ शकतात. असे पुणे विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी स्पष्ट केले. ज्यांना हा अमूल्य अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी https:it.ly/3tUCoQL या गूगल लिंक वर जाऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करमरकर यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.