जलतरण तलाव आणि वाचनालयात सावरकर पोहोचले पाहिजेत!

    139

    जर देशाला सकारात्मकतेच्या आणि राष्ट्रवादाच्या दिशेने घेऊन जायचे असेल तर प्रत्येकाला सावरकर कळले पाहिजेत. सावरकर घराघरात आणि मनामनात पोहोचले पाहिजेत आणि त्यासाठी अतिशय कल्पकतेने नवीन पिढीसमोर सावरकर गेले पाहिजेत. आताच्या पिढीला स्पायडरमॅन आवडतो, हल्क आवडतो, आयन मॅन आवडतो. हे सगळे काल्पनिक सुपरहीरो आहेत तरी सुद्धा या पात्रांनी लहान मुले आणि तरुण पिढीच्या मनावर राज्य गाजवले आहे. अशाप्रकारे सावरकर या पिढीसमोर घेऊन जाण्याची गरज आहे.

    आपल्याकडे अनेक ठिकाणी स्विमिंग पूल्स म्हणजे जलतरण तलाव आहेत. तिथे पोहायला शिकवले जाते. परंतु तरुणांनी का पोहावे? त्यामागचा त्यांचा उद्देश काय असला पाहिजे? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राष्ट्रीय कल्याणाचा हेतू कसा शोधू शकतो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. सावरकरांचा मार्सेलिसचा पराक्रम खूप मोठा आहे. सावरकरांनी मार्सेलिसच्या समुद्रात जी झेप घेतली त्यामुळे सबंध ब्रिटिश सरकार हलले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिश किती लबाड आहेत हे सिद्ध झाले. पहिल्यांदा ब्रिटिशांची छी-थू झाली. सावरकरांनी ब्रिटिश सरकारला मोठा धक्का दिला होता.

    या पराक्रमाची आठवण आपण जागृत ठेवली पाहिजे. प्रत्येकवेळी व्याख्याने आणि लेखनाने काम होणार नाही. थोडी कल्पकता वापरण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्व जलतरण तलावांच्या भोवती सावरकरांचा मार्सेलिसचा पराक्रम चित्राच्या माध्यमातून दाखवला जाऊ शकतो. मुलांमध्ये आपोआप उत्सुकता निर्माण होईल आणि पोहायला येणाऱ्या प्रत्येकापर्यंत ही घटना पोहोचेल. आपणही राष्ट्रासाठी पोहले पाहिजे, थोडक्यात कोणतेही काम करताना आपण देशाचा विचार केला पाहिजे ही भावना मुलांमध्ये निर्माण होईल.

    त्याचबरोबर वाचनालय एक अशी जागा आहे जिथे सावरकरांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अनुकूल परिस्थितीत किंवा अतिशय साध्या प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी वाचनालय निर्माण केले आहे. परंतु जिथे जगणे कठीण होते अशा ठिकाणी सावरकरांनी वाचनालय निर्माण करुन दाखवले आहे. अंदामानसारख्या भयाण कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी हा अद्भूत चमत्कार करुन दाखवला आहे. कैद्यांना वर्षातून एकदा आपल्या आवडत्या वस्तू मागवण्याची मूभा होती, तेव्हा कैदी काहीतरी चांगले खायला मागवायचे. परंतु सावरकरांनी सांगितले की तुम्ही पुस्तके मागवली पाहिजेत आणि चमत्कार झाला, अंदमानमध्ये जवळजवळ दोन हजार पुस्तकांचे वाचनालय उभे राहिले. आता श्याम मानव यांचा चमत्कार या शब्दावर आक्षेप आहे. परंतु इथे मात्र माझा नाईलाज आहे, यास चमत्कारच म्हणावे लागेल. म्हणून प्रत्येक वाचनालयात सावरकरांचा मोठा फोटो असलाच पाहिजे आणि अगदी दरवाजासमोर असला पाहिजे, जेणेकरुन प्रत्येक वाचकाची/सभासदाची पहिली नजर सावरकरांच्या फोटोवर पडेल आणि त्या फोटोखाली संदेश लिहिला पाहिजे की, अंदमानसारख्या भयाण कारागृहात २००० पुस्तकांचे वाचनालय उभारणारे सावरकर. अशा विविध प्रकारे आपण सावरकर मनामनात आणि घराघरात घेऊन जाऊ शकतो.

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.