‘मविआ’त पडली वज्रफूट?

195
‘मविआ’त पडली वज्रफूट?
‘मविआ’त पडली वज्रफूट?

– सुहास शेलार

शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली असताना, महाविकास आघाडीतही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात उद्धवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून परस्पर विरोधी विधाने केली जाऊ लागल्याने ‘मविआ’त वज्र‘फूट’ पडल्याच्या चर्चा आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींबाबत केलेल्या विधानांमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. गांधी परिवार आणि काँग्रेस अध्यक्षांबाबत विधाने करण्याचा चोमडेपणा राऊत यांनी करू नये, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. त्यावर, पटोलेंना त्यांच्याच पक्षात कोणी गांभीर्याने घेत नसल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी एकोप्याची भाषा करणाऱ्या ‘मविआ’ची वज्रमूठ एकमेकांवरच उगारली जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्ष असले, तरी पक्षाचे सर्व निर्णय राहुल गांधी हेच घेतात, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खर्गे यांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणे आणि गांधी परिवारावर चुकीचा आरोप करणे म्हणजे चोंबडेपणा आहे. राऊत त्यांनी तो थांबवावा. खर्गे यांच्याबाबत अशी विधाने करणे योग्य नाही, असे पटोले म्हणाले. तर, नाना पटोले यांच्या विधानांचा संजय राऊत यांनी बेळगावातून समाचार घेतला. नाना पटोले यांना त्यांचा पक्षच गांभीर्याने घेत नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापेक्षा माझ्याशी अधिक बोलतात, असे राऊत म्हणाले.

उद्धव सेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशाप्रकारे कलगीतुरा सुरू असताना, काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शहांसोबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या तीन बैठका झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी कर्नाटकात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. हा निकाल मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात गेला, तर नवीन मुख्यमंत्री नेमावा लागेल. तो कोठून घ्यायचा? बाहेरून घ्यायचा की राष्ट्रवादीतून घ्यायचा, याबाबत होत असलेल्या चर्चा सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील, याबाबत माहित नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला. या विधानावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

(हेही वाचा – शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित का नव्हता? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार चिडले अन् म्हणाले…)

पक्षांतर्गत बंड रोखण्यासाठी शरद पवारांचे धक्कातंत्र?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानकपणे अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, पवारांच्या धक्कातंत्रामागे पक्षांतर्गत बंड रोखण्याची खेळी असल्याचे बोलले जाते. गेले काही दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना घेऊन फुटणार असल्याची चर्चा असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही बडे नेतेही भाजपसोबत जाण्याच्या बाजूने आहेत. अशावेळी अचूक वेळ साधत शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या खेळीने पक्ष अजूनही ‘माझाच सांगाती’ असल्याचा संदेश पक्षातील नेत्यांना दिला.

‘वज्रमूठ’ सभांना ब्रेक

महाविकास आघाडीच्या वतीने (मविआ) राज्यातील विविध शहरात घेण्यात येणाऱ्या ‘वज्रमूठ’ सभा मे महिन्यातील उन्हामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी यामागे महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील समन्वय आणि एकीचा अभाव हे कारण आहे.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी वज्रमूठ सभा झाल्या. त्यानंतर पुण्यात १४ मे, कोल्हापूरला २८ मे तर नाशिकमध्ये ३ जून आणि अमरावती येथे ११ जून रोजी नियोजित वज्रमूठ सभांचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत तीन सभा झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे.

राज्यात सध्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सभा पुढे ढकलण्यात आल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. तर सध्या उन्हाळा कडक असल्याने या सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. पाऊस की उन्हामुळे सभा पुढे ढकलल्या याबाबतही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभेद बघायला मिळत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.