Dr. Amit Thadhani Interview: दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास भरकटला?

220
Dr. Amit Thadhani Interview
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास भरकटला?

अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या चार हत्याकांडांची बरीच चर्चा झाली. या हत्यांचा तपास विशेष तपास पथके, सीबीआय यांनी केला; पण यातील एकाही हत्येमधील खऱ्याखुऱ्या मारेकऱ्यांपर्यंत तपास यंत्रणा पोहचू शकल्या नाही. हे वास्तव आहे, या तपासात अनेक गोंधळ निर्माण करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. तपासातील त्रुटी डॉ. अमित थडानी यांनी त्यांच्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकात ठळकपणे मांडल्या आहेत. ज्यामुळे या चारही हत्याकांडामागील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हे पुस्तक डॉ. थडानी यांनी एकेका हत्या प्रकरणातील १० हजार पानांचे आरोपपत्र अभ्यास करून लिहिले आहे. या पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी यांची ही विशेष मुलाखत… (Dr. Amit Thadhani Interview)

१. दाभोलकर हत्या प्रकरण

प्रश्न : दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सदोष असल्याचा दावा तुम्ही का करत आहात?
डॉ. अमित थडानी : आधी पुणे पोलिस आणि नंतर सीबीआयने तपासात घोळ घातला आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या गेलेल्या ठिकाणाजवळ नाकाबंदी करूनही मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले. संशयित वारंवार बदलले आहेत, दोन लॅबचे फॉरेन्सिक अहवाल एकमेकांशी जुळत नाहीत. न्यायालये आणि डॉ. दाभोलकरांचे नातेवाईकही या तपासावर खूश नाहीत. (Dr. Amit Thadhani Interview)

प्रश्न : बंदूक आणि गोळ्यांचा फॉरेन्सिक अहवाल चुकीचा असल्याचे तुम्ही नमूद केले आहे, हे खरे आहे का?
डॉ. थडानी : कलिना फॉरेन्सिक लॅबने याला पुष्टी देताना म्हटले की, या प्रकरणात अटक केलेल्या दोन जणांकडून जप्त केलेले पिस्तुल दाभोलकरांच्या शरीरातून काढलेल्या गोळ्यांशी जुळत आहे. त्या गोळ्या याच पिस्तुलातून झाडल्या असे अहवालात म्हटले आहे. परंतू तपास यंत्रणांनी या दोन जणांवर कधीही हत्येचा आरोप केला नाही. त्यानंतर दुसऱ्या फॉरेन्सिक लॅबने त्यांच्या अहवालात परस्पर विरोधी मत मांडले. या लॅबने त्यांच्या अहवालात म्हटले की, त्या दोन आरोपींकडून हस्तगत केलेल्या पिस्तुलातील त्या गोळ्या नाहीत. तपास यंत्रणांनी या प्रकरणात दोन कथा मांडल्या, त्यातील एका कथेत आरोपींनी शस्त्र पुण्यात सोडले असे म्हटले आणि दुसऱ्या कथेत आरोपींनी शस्त्र ठाणे खाडीत टाकले असे म्हटले. या प्रकरणात अनेक कथा आहेत ज्यात तथ्य कुठेच दिसत नाही.

प्रश्न : तुम्ही दावा केला होता की संशयित देखील बदलले आहेत?
डॉ. थडानी : होय. पोलिसांनी सुरुवातीला दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली होती आणि त्यांच्याकडून पिस्तुल जप्त केले, त्या पिस्तुलाच्या गोळ्या आणि दाभोलकरांवर झाडलेल्या गोळ्या जुळत असल्याचे म्हटले. मात्र या प्रकरणातील पहिल्या आरोपपत्रात तपास यंत्रणांनी दोन वेगळ्या व्यक्तींची नावे आरोपी म्हणून घेतली, जे अनेक वर्षांपासून बेपत्ता होते. त्यानंतर दुसऱ्या आरोपपत्रात त्यांनी पुन्हा दोन वेगळ्या व्यक्तींची नावे घातली. पहिल्या आणि दुसऱ्या आरोपपत्रात नावे असलेल्या संशयितांची ओळख पटवण्यासाठी त्यांनी तेच तेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हजर केले. अशा रीतीने तेच तेच साक्षिदार ४ आरोपींची ओळख कशी सांगू शकतात? पुणे पोलीस आणि सीबीआयने काढलेली मारेकऱ्यांची रेखाचित्रेही वेगळी आहेत.

प्रश्न : दाभोलकरांची हत्या कोणी केली?
डॉ. थडानी : आम्हाला कदाचित कधीच कळणार नाही. या प्रकरणाचे कमालीचे राजकारण करण्यात आले आहे. संपूर्ण तपासात पक्षपातीपणा होत आहे. डॉ. दाभोलकरांची हत्या नेमकी कोणी केली हे शोधण्यासाठी ज्या शक्यता पडताळल्या पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, परिणामी खऱ्या मारेकऱ्यांना शोधण्याबाबत तडजोड केली जात आहे. (Dr. Amit Thadhani Interview)

२. एमएम कलबुर्गी हत्या प्रकरण

प्रश्न : एमएम कलबुर्गी यांचे शैक्षणिक कौशल्याचे क्षेत्र काय होते आणि ते त्यांच्या हत्येशी कसे जोडले गेले?
डॉ. थडानी : कलबुर्गी हे साहित्य विशेष म्हणजे लिंगायत साहित्यावर अधिक लिखाण करत असत. त्यांनी लिंगायत समाजातील काही वचनांचा अपारंपरिक पद्धतीने अर्थ लावला. अशा पद्धतीच्या त्यांच्या लिखाणामुळे लिंगायत समाज संतप्त झाला होता. उदाहरणार्थ, बसवांच्या मुलाच्या पितृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आरोप केले, लिंगायत हिंदू नसल्याचा दावा केला, कलबुर्गी यांनी एक तथाकथित विचारवंताचे समर्थन केले होते, ज्यांनी हिंदू देवतांच्या मूर्तींवर लघवी केली पाहिजे असे म्हटले होते. या कारणांसाठी त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. एकदा तर त्यांना लिंगायत मठात बोलावून घेण्यात आले होते आणि त्यांना त्यांचे काम बंद करण्यास सांगितले होते. त्यांच्या अशा लिखाणांमुळे ते वादात सापडले होते. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असावी. तथापि, याव्यतिरिक्त कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करताना इतरही शक्यतांचा विचार झाला पाहिजे, जसे त्यांच्या कुटुंबात मालमत्तेवरून वाद होते. त्याही दिशने तपास झाला पाहिजे.

प्रश्न : कलबुर्गी यांच्या हत्येला कोण जबाबदार आहे असे तुम्हाला वाटते?
डॉ. थडानी : कलबुर्गी हे खूप द्वेषपूर्ण व्यक्तीमत्व होते आणि त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या होत्या. त्यांना राज्य सरकारने सुरक्षा दिली होती. मात्र, त्यांनी ती सुरक्षा का नाकारली या मागील कारण कळले नाही. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही त्यांना संरक्षण देण्यात सरकारला एकप्रकारे अपयश आले. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर एका सराईत गुन्हेगाराने लगेचच त्यांच्या हत्येचा आनंद साजरा करताना ट्विट केले आणि एमएम कलबुर्गी यांच्या आणखी एका ‘बुद्धिवादी’ सहकाऱ्याला धमकी दिली. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीला कलबुर्गी हत्येबाबत कधीही अटक किंवा चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही.

(हेही वाचा – वीर सावरकरांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले माहिममधील दत्त मंदिर तोडण्याचा डाव)

३. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण 

प्रश्न : कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाली त्या ठिकाणची परिस्थिती काय होती? 
डॉ. थडानी : जवळच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करून घरी परतत असताना कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर दोन मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत पानसरे यांचा मृत्यू झाला, मात्र त्यांची पत्नी बचावली. तसेच आणखी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. पण अडचण अशी आहे की, दोनही प्रत्यक्षदर्शींनी त्याच मारेकऱ्यांना ओळखलेले नाही.

प्रश्न : कॉम्रेड पानसरे विवेकवादी होते का?
डॉ. थडानी : ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) मुख्य प्रवाहातील राजकारणी होते. डॉ दाभोलकर यांच्याशी त्यांचे संबंध होते जे त्यांना आपले गुरू मानत होते.

प्रश्न : समीर गायकवाड कोण आहे आणि पानसरे यांच्या हत्येमध्ये त्याची भूमिका काय आहे?
डॉ. थडानी : समीर गायकवाड हे सनातन संस्थेचे साधक आहेत. त्यांना काही काळ अटक करण्यात आली होती आणि पानसरे यांच्या हत्येचा आरोप त्यांच्या एका महिला मैत्रिणीशी झालेल्या संभाषणाच्या आधारे लावण्यात आला होता, ज्यात त्यांनी पानसरेंना गोळ्या घातल्याचा दावा केला असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. या गुन्ह्यासाठी समीर यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. परंतु नंतर असे आढळून आले की, समीर यांनी त्यांच्या मैत्रिणीशी बोलताना उत्साहाच्या भरात असंबंध वक्तव्य केले होते. ज्याचा तपास यंत्रणांनी तो अर्थ काढला होता. म्हणूनच समीर यांच्यावर आरोपपत्र दाखल होऊनही त्यांची जामिनावर सुटका झाली. उत्सुकतेची बाब म्हणजे, नंतर दुसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले ज्यात दोन वेगळ्याच आरोपींची नावे देण्यात आली. (Dr. Amit Thadhani Interview)

प्रश्न : आता तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे, खरे मारेकरी सापडतील असे तुम्हाला वाटते का?
डॉ. थडानी : मला अशी आशा आहे, परंतु ते शक्य नाही. कॉम्रेड पानसरे मृत्यूसमयी अनेक कार्यात सहभागी होते. पानसरे बुद्धीवादी होते म्हणून त्यांना ठार केले असावे अशीच शक्यता धरून तपास होत आहे, त्यांच्या हत्येमागील दुसऱ्या शक्यता कुणीही शोधत नसल्याने खरे मारेकरी कसे सापडतील?

४. गौरी लंकेश हत्या प्रकरण

प्रश्न : बंगळुरू सीआयडीने जारी केलेली गौरी लंकेश यांच्या कथित मारेकऱ्यांची छायाचित्रे संशयास्पद असल्याचा दावा तुम्ही केला आहे. त्याचे कारण काय?
डॉ. थडानी : गौरी लंकेश यांची सायंकाळी उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या घराबाहेरील पथदिवे बंद होते. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटारसायकलवरील दोन व्यक्ती गौरी लंकेश त्यांच्या घरी पोहोचण्याची वाट पाहत फिरताना दिसत आहेत. गौरी या बागेचे गेट उघडताच त्यातील एकाने त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्यावर गोळी झाडली. समस्या अशी आहे की, मारकऱ्याने हेल्मेट घातले होते. दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा देखील रेकॉर्ड केलेला नाही. सीआयडीने इतर सीसीटीव्हीमधून फुटेज गोळा केल्याचा दावा केला आहे, ज्यात मारेकऱ्यांचे चेहरे दिसत असल्याची शक्यता व्यक्त केली. पण तपास यंत्रणांनी दोन नव्हे तर तीन व्यक्तींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. याहून धक्कादायक म्हणजे दोन वर्षांनी तपास यंत्रणांनी आणखी चार जणांचे मारेकरी म्हणून रेखाचित्रे काढली. यातील कुणाचाही चेहरा आधीच्या संशयितांच्या रेखाचित्राशी मिळता जुळता नव्हता.

प्रश्न : गौरी लंकेश यांच्या हत्येमागचा हेतू काय आहे असे तुम्हाला वाटते?
डॉ. थडानी : गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी घट्ट नाते होते. त्यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक कट्टर नक्षल कमांडर होता. गौरी यांचे राजकीय विचार हे तिच्या त्या मित्रापेक्षा वेगळे नव्हते. तथापि, सिद्धरामय्या सरकारने नक्षलवाद्यांना शस्त्रे टाकण्यास आणि मुख्य प्रवाहात परत येण्यास पटवून देण्याच्या कामासाठी गौरी लंकेश यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या हत्येच्या काही तास आधी, त्यांनी ट्विट केले होते की, “कॉम्रेड्”ने एकमेकांपेक्षा त्यांच्या खऱ्या शत्रूंवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. गौरी लंकेश यांचे त्यांच्या भावासोबतही जोरदार वाद झाले होते. त्यामुळे त्यांचा हत्येमागे एकच कारण असू शकत नाही. या प्रश्नाचे एकच उत्तर नाही. गौरी लंकेश या अत्यंत आक्रमक ‘हिंदुत्वविरोधी’ असल्याने वैचारिक मतभेदांमुळे त्यांची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. परंतु त्याच वेळी त्यांच्या हत्येमागील इतरही शक्यता असू शकतात आणि त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी होती. तथापि, गौरी लंकेश यांच्या मृत्यूचे राजकारण केले जात असल्यामुळे त्यांच्याही हत्येचा तपास एका विशिष्ट दिशेने होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.