Asian Games 2023 : पहिल्या आशियाई स्पर्धेत ५१, मध्ये मोठा खड्डा आणि २०२३ मध्ये पदकांचं गोड शतक

141
Asian Games 2023 : पहिल्या आशियाई स्पर्धेत ५१, मध्ये मोठा खड्डा आणि २०२३ मध्ये पदकांचं गोड शतक
Asian Games 2023 : पहिल्या आशियाई स्पर्धेत ५१, मध्ये मोठा खड्डा आणि २०२३ मध्ये पदकांचं गोड शतक
ऋजुता लुकतुके

आपण आपल्या खेळाडूंकडून चाहते म्हणून नेहमीच अपेक्षा करतो. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर इतकं कसं जमत नाही या मुलांना, असं म्हणत सहजपणे रागही व्यक्त करतो. दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या की, या दोन प्रकारच्या हेडलाईन ठरलेल्या!
यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र झालं असं की, टीव्ही प्रसारकांनी अब की बार सौ पार असा हॅशटॅग स्पर्धेच्या प्रसारणाला दिला आणि भारतीय खेळाडूंनी तो तंतोतंत अंमलात आणला. असं करताना भारताला काही नवीन खेळ गवसले, काही खेळाडू गवसले. महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख गवसली. (Asian Games 2023 )
म्हणूनच पदकांचं हे शतक ‘गोड शतक’ आहे. तसंही मेहनतीचं फळ गोड असतं असंच म्हणतात. खेळाडू, प्रशिक्षक आणि खेळांचे संघटक यांची एकत्र मेहनत असते तेव्हा फळ गोड तर असतंच शिवाय अंगाला लागणारं असतं.
चीनच्या होआंगझाओ शहरात झालेल्या या आशियाई क्रीडास्पर्धेची सुरुवात भारतासाठी खरंतर फारशी आश्वासक झाली नव्हती. चीनने अरुणाचल प्रदेशच्या २ वुशू खेळाडूंना व्हिसा नाकारला. सीमेवर भारत आणि चीन दरम्यानच्या संघर्षाची किनार चीनच्या कृतीमागे होती. त्यामुळे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर स्पर्धेच्या स्वागत समारंभ तसंच समारोपाला चीनला गेले नाहीत. एकूणच चीनची भारताला मिळणारी वागणूक तशी थंडच होती.
पण, एकदा क्रीडा मंत्रालयाकडून स्पर्धेत खेळण्याला गो अहेड मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी बाकीच्या गोष्टींचा बाऊ केला नाही. एकट्या चीनने २०१ सुवर्ण पदकं मिळवली. पण, भारताने आपली दौड सुरूच ठेवली. अखेर २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांसह भारतीय संघाने एकूण १०७ पदकं पटकावली. या स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघाने पदकांचं शतक साजरं केलं. म्हणून या यशाचं मोल मोठं आहे.
आशियाई स्पर्धा भारतातच १९५१ साली सुरू झाल्या. त्या स्पर्धेत मिळवलेल्या ५१ पदकांनंतर मध्ये २००६ च्या दोहा आशियाई खेळांपर्यंत एक मोठा खड्डा (परत पदकांची संख्या पन्नाशीत गेली नाही) आणि २००६ पासून पदकांची संख्या वाढत जाऊन ती शंभरीच्या पार गेली आहे.
सुवर्ण पदकांच्या निकषावर बोलायचं झालं, तर १९५१ मध्ये मिळवलेल्या १५ सुवर्णांनंतर दुहेरी आकडा भारताने १९ स्पर्धांमध्ये फक्त १० वेळा गाठला आहे. तोही जेमतेम. उलट १९९० मध्ये कबड्डी या खेळानं तारलं म्हणून नाहीतर सुवर्णांची संख्या शून्यावर आली असती.
खेळांमध्ये आकडेवारीची एक वेगळी गंमत असते. आकडेवारीत यश मोजता येतं. या यशाचे आकड्यांमध्ये विक्रम मोजता येतात. खेळाची मजा त्यातून वाढत जाते. आशियाई स्तरावरही भारताला आतापर्यंत १५ सुवर्ण पदकांचा आकडा गाठता आला नव्हता. तो यंदा आपण २८ वर नेला हे या आकडेवारीतूनच आपल्याला समजलं. भारतीय संघाची ही वाटचाल त्यामुळेच महत्त्वाची आहे.

कुठे मिळालं यश?
नेमबाजी हा १९९० च्या दशकापासून भारतीय खेळाडूंचा गड आहे. खरंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीच्या स्पर्धा नियमित व्हायला लागल्या. ऑलिम्पिक स्तरावर नेमबाजी सुरू झाली आणि तिथे भारतीय खेळाडूंना पदकं मिळायला सुरुवात झाली अशी खरी परिस्थिती आहे. यंदाही चित्र काही वेगळं नव्हतं. नेमबाजांनीच पदकांचा मोठा भार उचलला आहे; पण नेमबाजांना यावेळी ॲथलेटिक्स क्रीडाप्रकारांनी मागे टाकलं, ही कामगिरी नेत्रदीपक आहे.
ॲथलेटिक्समध्ये यश मिळवण्यासाठी खरी शारीरिक ताकद लागते. या स्पर्धेत तुमचा खरा कस लागतो; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरुवातीला पी टी उषा आणि आदिल सुमारीवाला ही दोन नावं सोडली तर फारसं यश कुणालाच मिळालं नव्हतं. पुढे अंजू बॉबी जॉर्ज, हिमा दास, द्युती चंद यांनी थोडीफार आशा दाखवली. पण, २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने चक्क सुवर्णाला गवसणी घातली. यंदा आशियाई स्तरावर भारताने सर्वाधिक २९ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवली आहेत.
एकूण २८ खेळांमध्ये भारताने यंदा पदकं मिळवली. काही खेळांमध्ये पदकांचा भोपळा फोडला. अगदी घोडेस्वारी, वुशू, सेलिंग अशा एरवी भारताचं आंतरराष्ट्रीय अस्तित्व नसलेल्या खेळांमध्ये भारताने प्रगती केली आहे. जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीए या उक्तीप्रमाणे भारताची पदक विजेत्या खेळाडूंची यादी लंबी चौडी झाली आहे.

आशियाई स्पर्धेत पहिलं वहिलं यश
काही खेळांनी आणि खेळाडूंनी स्पर्धेतील पहिली यशाची चव चाखली. अविनाश साबळे आणि पारुल चौधरी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या लांब पल्ल्यांच्या शर्यतीत भारतासाठी या स्तरावर पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. अन्नूराणीची ६२ मीटरची भालाफेक तिला भारतासाठी या प्रकारातील पहिलं सुवर्ण देऊन गेली. नंतर नीरजनेही सुवर्णाचा वेध घेतला.बॅडमिंटनमध्ये तर चिनी, चायनीज तैपई आणि मलेशिया, जपानचं आव्हान मोडून काढत भारताने ४१ वर्षांनंतर पहिल्यांदा पदक जिंकलं. एच एस प्रणॉयने वैयक्तिक रौप्य तर सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर दुहेरीत सुवर्णालाच गवसणी घातली. चीन या देशाच्या माहेरघरात या तिघांनी मिळवलेलं यश कायम स्मरणात राहील.कॅनॉइंगमध्ये यंदा भारताला पदक मिळालं. तिरंदाजीत तर शेवटच्या दोन दिवसांत कम्पाऊंड प्रकारात तिरंदाजांनी धमाल उडवून दिली. घोडेस्वारी हा खेळ भारतात फारसा कुणाला माहीतही नाही. मग त्याची चर्चा तर राहूच दे. पण, यंदा ड्रेसेज प्रकारात भारताला सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक कांस्य मिळालं. ४१ वर्षांनंतर घोडेस्वारीत भारताला एखादं पदक मिळवता आलं.याशिवाय सेलिंगमध्ये विष्णू सर्वाननचं कांस्य, सेपाक्ताक्रॉ खेळात महिलांनी मिळवलेलं कांस्य आणि गोल्फमध्ये अदिती अशोकचं रौप्य या पदकांची गोडीही अवीट आहे. देशाची प्रगती आणि वाटचाल दाखवणारी आहे.

खेळाडूंचं यश नेमकं काय सांगतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय खेळाडूंचं स्वागत करताना म्हणाले की, खेळाडूंचं यश १४० कोटी जनतेमध्ये उत्सवी आनंद पेरणारं आहे. खरंच भारतीय क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह देणारं हे यश आहे. पुढील वर्षी २०२४ मध्ये पॅरिस इथं ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे यश उमेद निर्माण करणार आहे.
२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदकं जिंकली. त्यात चक्क नीरज चोप्राचं एक सुवर्णही होतं. यंदा आशियाई खेळांच्या निमित्ताने काही खेळाडूंनी ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण केला आहे. आता पदकांची ही दौड ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचं आव्हान या खेळाडूंसमोर आहे.मागची १५ वर्षे सातत्याने भारतीय खेळाडू निदान आशियाई स्तरावर ५० पदकांचा मापदंड ओलांडत होते. फक्त त्यात निर्विवाद वर्चस्वाच्या सुवर्ण पदकाचा समावेश होत नव्हता. यंदा भारताने तिथेही २५ चा आकडा ओलांडला.क्रीडा मंत्रालय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून खेळाडूंना पुरवत असलेल्या सुविधा आणि आर्थिक मदत यांचा हा परिणाम आहे. संभाव्य पदक विजेत्यांसाठी टॉप्स योजना, खेळाडू शिष्यवृत्ती योजना, त्यांच्या स्पर्धेचा आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचा संघटनेनं उचलेलं खर्च, सरावाची चांगली साधनं, परदेशी प्रशिक्षकांची सोय यांचा चांगला उपयोग होताना दिसतोय.देशांतर्गत स्तरावरही स्पर्धेचा स्तर उंचवतोय. पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणल्याप्रमाणे यंदा पदक विजेत्या महिलांची संख्याही तुल्यबळ आहे. आता एकच करायचं आहे. या विजयाने अल्पसंतुष्ट राहायचं नाही, कारण अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. आशियाई स्तरावरील यश जागतिक स्तरावर पोहोचेल तो खरा सुवर्ण क्षण असेल. त्याला नक्कीच अजून अवकाश आहे.

यशाची पहिली चव

  • आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच २८ सुवर्ण
  • बॅडमिंटनमध्ये पहिलं सुवर्ण
  • घोडेस्वारीत ड्रेसेज प्रकारात पहिलं सुवर्ण
  • गोल्फमध्ये पहिलं रौप्य
  • ॲथलेटिक्समध्ये लांब पल्ल्याच्या शर्यतीत पहिलं सुवर्ण
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.