Naval Commanders’ Conference : नवी दिल्ली येथे 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत दुसरी नौदल कमांडर्स परिषद होणार

157
Naval Commanders' Conference : नवी दिल्ली येथे 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत दुसरी नौदल कमांडर्स परिषद होणार
Naval Commanders' Conference : नवी दिल्ली येथे 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत दुसरी नौदल कमांडर्स परिषद होणार

2023 ची दुसरी नौदल कमांडर्स परिषद (Naval Commanders’ Conference) नवी दिल्ली इथे 4 ते 6 सप्टेंबर 23 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. नौदल कमांडर्समध्ये चर्चा करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्याच्या उद्देशाने संवाद साधण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून अत्युच्च-स्तरीय द्वैवार्षिक कार्यक्रम आखण्यात आला आहे. ‘एकत्रित’ स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या ३ दिवसीय परिषदेदरम्यान नौदल प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली भारतीय नौदलाचे वरिष्ठ नेतृत्व प्रमुख गेल्या ६ महिन्यांत हाती घेतलेल्या कार्यतत्परता, साधनसामग्री, व्यूहरचना, मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि प्रशासकीय या बाबींचा आढावा घेतील. आगामी काही महिन्यांत आखावयाच्या उपक्रमांवरही या परिषदेत चर्चा होईल.

(हेही वाचा – Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; कारवाईला सुरुवात)

सन्माननीय संरक्षण राज्यमंत्री परिषदेदरम्यान नौदल कमांडर्सना संबोधित करतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. यावेळी संरक्षण दलांचे प्रमुख देखील उपस्थित असतील. देशाच्या सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी आवश्यक असलेल्या संरक्षित, तसेच सुरक्षित सागरी वातावरणाच्या विकासासाठी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतर-मंत्रालयीन उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी नौदल कमांडर्सच्या संस्थात्मक संवादाची संधी देखील या परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे. (Naval Commanders’ Conference)

या परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा संस्थेशी असलेला संवाद, भारतीय लष्कराचे प्रमुख आणि भारतीय हवाई दल यांच्यात परस्पर समन्वयाच्या सहाय्याने कार्यतत्पर वातावरणाचे विश्लेषण, तिन्ही सेवादलांमधील ताळमेळ साधण्याबाबत विचारविनिमय आणि सागरी दलांच्या तयारीचे मूल्यांकन केले जाईल.

गेल्या ६ महिन्यांत भारतीय नौदलाची कार्यवाही अटलांटिकपासून पॅसिफिकपर्यंत व्यापक प्रमाणावर दिसल्यामुळे कार्यवाहीसंदर्भात प्रखर गतिमानता आढळून आली आहे. ‘ऑपरेशन कावेरी’ च्या माध्यमातून सुदानमधल्या भारतीय नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी, तसेच मोचा चक्रीवादळाच्या वाताहतानंतर म्यानमारमधील ‘ऑपरेशन करुणा’ अंतर्गत मानवी सहाय्यता आणि आपत्कालीन बचावाच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या जहाजांनी सर्वात प्रथम प्रतिसाद दिला होता. भारतीय नौदल हा प्राधान्यक्रमी असलेला सुरक्षा भागीदार आणि कोणत्याही क्षेत्रीय संकटाला प्रथम प्रतिसाद देणारा आहे ही अपेक्षा कायम ठेऊन, हा मंच नौदलाच्या शस्त्रास्त्रे/सेन्सरच्या कामगिरीवर विशेष लक्ष केंद्रित करत नौदल कार्यस्थळांच्या कार्यतत्परतेचा तपशीलवार आढावा घेईल.

सहभागी कमांडर्स आगामी 2047 पर्यंत संपूर्ण ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यामतून स्वदेशीकरणाचा मोठ्या प्रमाणावर पुरस्कार करण्यावर लक्ष केंद्रित करून सुरू असलेल्या नौदल प्रकल्पांचा आढावा घेतील. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाद्वारे स्वदेशीकरण, नवकल्पना आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे प्रात्यक्षिकाचं देखील नियोजन करण्यात आलं आहे. जीवनमान सुधारण्यासाठी विविध मनुष्यबळ उपक्रमांचा तसेच भारतीय नौदलातील पुरातन पद्धती जाणून घेऊन त्या दूर करण्याच्या उद्देशाने होत असलेल्या प्रयत्नांच्या प्रगतीचा आढावाही घेतला जाईल. (Naval Commanders’ Conference)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.