आयएनएस सुजाता युद्धनौकेची मोझांबिकमधील मापुटो बंदराला भेट!

4

नौदलाच्या दक्षिण कमांड अंतर्गत कोची इथल्या आयएनएस सुजाता या युद्धनौकेने 19 ते 20 मार्च या काळात मोझांबिकमधील मापुटो बंदराला भेट दिली. वाद्यवृंद आणि पारंपरिक नृत्यासह युद्धनौकेचे मोझांबिक बंदरावर स्वागत करण्यात आले. कॅप्टन नितीन कपूर, डीए प्रिटोरिया, कमांडर एनआरएन शिवा बाबू, तटरक्षक दल (कोस्ट गार्ड अफ्लोट सपोर्ट टीम) आणि मोझांबिक नौदलाचे कॅप्टन फ्लोरेंटिनो जोस नार्सिसो यावेळी उपस्थित होते.

( हेही वाचा : “न्यायालयाचा काहीही निर्णय आला तरी…” सत्तासंघर्षावरील निकालाआधी शिवसेनेच्या खासदाराचे सूचक विधान! )

आयएनएस सुजाताचे कमांडिंग ऑफिसर यांनी मोझांबिक नौदलाचे रिअर अॅडमिरल युजेनियो डायस दा सिल्वा मुआटुका, मोझांबिकन नौदलाचे कमांडर एनीस दा कॉन्सेकाओ कोमिचे यांची भेट घेतली. मापुटोचे महापौर अंकन बॅनर्जी, भारताचे उच्चायुक्त आणि इतर अनेक लष्करी तसेच नागरी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मोझांबिक नौदलाच्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांनी क्रॉस डेक प्रशिक्षणासाठी आयएनएस सुजाता युद्धनौकेला भेट दिली. प्रशिक्षण सुविधा, डायव्हिंग ऑपरेशन्सची माहिती, व्हीबीएसएस, हलकी शस्त्रे, दृश्यात्मक संप्रेषण, यंत्रसामग्रीची देखभाल आणि जहाजावरील स्वच्छता यांचा या प्रशिक्षणात समावेश होता. दोन्ही नौदलाच्या जवानांनी मिळून सकाळचे योग सत्र, सॉकर सामना अशा विविध उपक्रमांमधे भाग घेतला. सुजाता जहाजावर स्वागत समारंभही आयोजित केला होता. यात अनेक भारतीय तसेच मोझांबिकन मान्यवर/मुत्सद्दी सहभागी झाले. आयएनएस सुजाताच्या मोझांबिकमधील मापुटो भेटीमुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.